भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : दक्षिण कोरियावर 3-2 ने मात
वृत्तसंस्था/ राजगिर, बिहार
स्ट्रायकर दीपिकाने सामना संपण्यास तीन मिनिटे असताना पेनल्टी स्ट्रोकवर नोंदवलेल्या गोलाच्या आधारे भारतीय महिला हॉकी संघाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील सामन्यात दक्षिण कोरियावर 3-2 असा विजय मिळविला. अन्य सामन्यात चीनने मलेशियावर 5-0 अशी एकतर्फी मात केली तर थायलंड व जपान यांचा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला.
पूर्वार्धात भारताने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. संगीता कुमारीने तिसऱ्या मिनिटाला तर दीपिकाने 20 व्या मिनिटाला हे गोल नोंदवले. कोरियाने तिसऱ्या सत्रात जोरदार मुसंडी मारत दोन गोल नोंदवून भारताशी बरोबरी साधली. युन लीने 34 व्या तर कर्णधार युनबी चेऑनने 38 व्या मिनिटाला हे गोल नोंदवले. निर्णायक गोल नोंदवण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आणि त्यात भारताला यश मिळाले. 57 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर दीपिकाने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवत भारताचा विजय निश्चित केला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने मलेशियावर 4-0 अशी एकतर्फी मात केली होती. भारताची पुढील लढत थायलंडविरुद्ध गुरुवारी होणार आहे. मंगळवारी झालेल्या अन्य एका सामन्यात थायलंड व जपान यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली तर ऑलिम्पिक रौप्यविजेत्या चीनने मलेशियाचा 5-0 असा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय नोंदवला.
भारतीय महिलांनी प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला. त्यांनी इतके वर्चस्व राखले होते की पहिल्या दोन सत्रात दक्षिण कोरियाला भारतीय गोलच्या दिशेने एकही फटका मारण्याची संधी मिळाली नाही. कोरियन बचावफळीवर भारताने वारंवार हल्ले करीत त्यांना दडपणाखाली ठेवत काही संधी निर्माण केल्या. त्यापैकी दोनवर मैदानी गोल नोंदवण्यात भारताला यश आले. तिसऱ्याच मिनिटाला संगीताने भारताला आघाडी मिळवून दिली. नेहा गोयलने चाल रचत नवनीत कौरकडे चेंडू पुरविला. तिने सर्कलमधील संगीताकडे चेंडू सोपवला. तिने मार्करला हुलकावणी देत रिव्हर्स फटक्यावर चेंडूला अचूक गोलपोस्टची दिशा दिली. उत्तरार्धात कोरियाने बरोबरी साधल्यानंतर अखेरच्या टप्प्यात दीपिकानेच पेनल्टी स्ट्रोकवर भारताचा निर्णायक विजयी गोल नोंदवला.