मुंबईचा हिमाचलप्रदेशवर डावाने विजय
मुलानीचे 5 बळी, मुशीर खान ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / मुंबई
रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाइट ड गटातील येथे सोमवारी झालेल्या सामन्यातील तिसऱ्याच दिवशी मुलानीच्या फिरकीच्या जोरावर यजमान मुंबईने हिमाचलप्रदेशचा एक डाव आणि 120 धावांनी दणदणीत पराभव करत बोनस गुणासह पूर्ण गुण वसुल केले. मुलानीने 37 धावांत 5 गडी बाद केले. मुशीर खानला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात मुंबई संघाने पहिल्या डावात 446 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर हिमाचलप्रदेशचा पहिला डाव 65.5 षटकात 187 धावांत आटोपल्याने त्यांना फॉलोऑन स्वीकारावा लागला. मुंबईच्या पहिल्या डावात मुशीर खान आणि सिद्धेश लाड यांनी दमदार शतके झळकविली. मुलानीने 69 धावांचे योगदान दिले. हिमाचलप्रदेशच्या पहिल्या डावात हिमांशु सिंगने 3 तर तुषार देशपांडे व मुलानी यांनी प्रत्येकी 2, शार्दुल ठाकुर, डिसोजा आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. हिमाचलप्रदेशने 7 बाद 94 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 65.5 षटकात 187 धावांत आटोपला.
हिमाचलप्रदेशने फॉलोऑन स्वीकारल्यानंतर दुसऱ्या डावातही मुंबईच्या अचूक गोलंदाजीसमोर हिमाचल प्रदेशचे फलंदाज अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकले नाहीत. पुकराज मानने 102 चेंडूत 9 चौकारांसह 65 धावा तर गंगटाने 2 चौकारांसह 23 आणि कालसीने 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. हिमाचलप्रदेशच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. 49.1 षटकात हिमाचलप्रदेशचा दुसरा डाव 139 धावांत आटोपल्याने मुंबईने हा सामना एक डाव आणि 120 धावांनी जिंकला. मुलानीने 37 धावांत 5 तर शार्दुल ठाकुर, तुषार देशपांडे व आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुशीर खानने 23 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यात मुलानीने 7 बळी मिळविले तर मुशीर खानने अष्टपैलु कामगिरीचे दर्शन घडविताना फलंदाजीत 112 धावांची खेळी केली. तसेच त्याने गोलंदाजीत 3 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव सर्वबाद 446, हिमाचलप्रदेश प. डाव 65.5 षटकात सर्वबाद 187 (गंगटा नाबाद 64, मान 34, वैभव अरोरा 51, हिमांशु सिंग 3-54, मुलानी व देशपांडे प्रत्येकी 2 बळी, शार्दुल ठाकुर, डिसोजा, मुशीर खान प्रत्येकी 1 बळी), हिमाचल प्रदेश दु. डाव 49.5 षटकात सर्वबाद 139 (मान 65, गंगटा 23, कालसी 19, मुलानी 5-37, मुशीर खान 2-23, म्हात्रे, देशपांडे, ठाकुर प्रत्येकी 1 बळी).