‘मल्टिटेलंटेड’ श्रीजा नाईक
खेळात कौटूंबिक पार्श्वभुमी असलेली मडगावची श्रीजा शैलेश नाईक लहान वयातच आपला खेळातील आलेख दिवसेदिवस वाढवित आहे. दहा वर्षीय श्रीजा हिच्याकडे कोवळ्या वयातच एक ‘मल्टि टेलंटेड’ क्रीडापटू असून राष्ट्रीय पातळीवरील क्रीडापटू बनण्याची जबरदस्त प्रतिभा तिच्यात आहे. तिने विविध स्पर्धांतून घेतलेल्या सहभागातून आणि मिळविलेल्या बक्षीसांतून श्रीजा ही क्रीडा क्षेतात राज्यासाठी उज्वल भवितव्य असल्याचे दिसून येत आहे.
क्रीडापटूंना नेहमीच प्रोत्साहित करणाऱ्या नावेलीतील पर्पेच्युअल सुकूर काँव्हेंट हायस्कूल या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या श्रीजाचे स्वप्न आहे ते खेळात राज्याचे आणि प्रामुख्याने देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे. मॅरेथॉन, जिम्नॅस्टिक्स, जलतरण आणि फुटबॉल या चारही खेळात लहान वयातच प्रभुत्व असलेल्या श्रीजाचा दिनक्रम सुरू होतो तो सकाळी पाच वाजल्यापासून.
वयाच्या चौथ्या वर्षांपासून आपले काका संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉल खेळातील धडे गिरवणारी श्रीजा घरापासून जवळच असलेल्या मडगावच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर सकाळी 6 ते 7 पर्यंत फिटनेस करते. त्यानंतर 7.30 वाजता शाळेत गेल्यानंतर दुपारी 3.15 वाजता फातोर्डा येथील जतलण तलावात प्रशिक्षण घेते तसेच फुटबॉल आणि जिम्नॅस्टिक्स या खेळालाही प्राधान्य देते.
2022 मध्ये जिम्नॅस्टिक्स खेळात उतरलेल्या श्रीजाने या खेळातील आपले पहिले पदक एप्रिल महिन्यातील अखिल गोवा पातळीवरील आर्टिस्टीक जिम्नेस्टिक्स स्पर्धेत 8 वर्षांखालील गटातील फ्लोअर एक्झरसाईजमध्ये ब्राँझपदकाने केले. त्यानंतर डिसेंबर महिन्यात फ्लोअर एक्झरसाईझमध्ये सुवर्ण, बीममध्ये रौप्य तसेच टेबल वॉल्टमध्ये ब्राँझ अशी अल्पवधीतच श्रीजाने या जिगरी खेळावर आपलं प्रभुत्व सिद्ध केले. राज्य पातळीवरील जबरदस्त कामगिरीच्या बळावर श्रीजाने पुण्यात झालेल्या आमंत्रितांच्या अखिल भारतीय इन्फिनिटी जिम्नॅस्टिक्स एलएलपी स्पर्धेत भाग घेऊन फ्लोअर एक्झरसाईजमध्ये दोन सुवर्ण, वॉल्टिंग टेबलमध्ये रौप्य तर ऑल राऊंड प्रकारात ब्राँझ मिळविले.
मॅरेथॉन हा श्रीजाचा आवडता खेळ प्रकार. राज्यात आयोजित होणाऱ्या जवळजवळ सर्व मॅरेथॉनमध्ये तिने भाग घेतला असून बक्षीसेही अमाप मिळविली आहेत. 2022 मध्ये जुलैच्या महिन्यात आपली पहिली दौड लगावलेल्या श्रीजाने आतापर्यंत गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रात विविध क्लब्स तसेच संस्थांने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. श्रीजाचा गोव्यातील प्रसिद्ध ‘रेन रन मॅरेथॉन’, डॉ. रामाणी मॅरेथॉन, एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन, मॅरेथॉन दी प्रियोळ, माऊंटन रन बोरी, रन फॉर युनिटी, प्रजासत्ताक रन, नॅशनल रेड रिबन रन तसेच कारवार येथे आयोजित करण्यात येणाऱ्या नेव्हल बेस रनमधील सहभाग नित्यनेमाचा झालेला आहे. खेळात नैपुण्य दाखविलेल्या श्रीजाला 2021-22 शालेय वर्षांची उत्कृष्ट विद्यार्थीनी म्हणूनही तिच्या शाळेने तिचा गौरव केला आहे. फातोर्डा येथील गुड शेपर्ड ही क्रीडापटूंना गौरविणारी संस्था तसेच दिया ऑर्गनायझेशन या संस्थेचेही क्रीडा नैपुण्य पुरस्काराची श्रीजा ही मानकरी टरली आहे. गोव्याचे प्रसिद्ध गोलरक्षक बक्षी बहाद्दर जिवबादादा केरकर पुरस्कार विजेते चंद्रकांत नाईक यांच्या घराण्यातील असलेली श्रीजाला फुटबॉल खेळात गोलरक्षक बनायचयं. आपल्या शाळेसाठी वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या श्रीजाचे गोलरक्षणातील कसबही थक्क करणारे आहे. या खेळातही उच्च स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न श्रीजा आपल्या लहान वयातच बाळगत आहे.
आपल्या यशाचं सारे श्रेय ती आपल्याला नियमित प्रोत्साहीत करणारे आपले पालक शैलेश व ज्योती तसेच फुटबॉल खेळातील तिचे प्रशिक्षक काका संदीप नाईक, जलतरण खेळातील प्रशिक्षक प्रकाश नाईक व इनासियो रापोझ तसेच जिम्नॅस्टिक्समधील प्रशिक्षिका कल्पिता नाईक यांना देते. आपल्या यशात शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिबिया फर्नांडिस यांचाही मोलाचा वाटा असल्याचे श्रीजा सांगते. खेळात आपणाला नेहमीच तिने आणि शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याचे श्रीजा अभिमानाने सांगते.
श्रीजा नाईकची विविध मॅरेथॉनमधील कामगिरी
- लायन्स क्लब कुडचडेने आयोजित केलेल्या स्पर्धेत तिसरे स्थान.
- डॉ. रामाणी (3 किलोमीटर) मॅरेथानमध्ये दुसरे स्थान.
- वाळपई मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान.
- महामाया एससीसीच्या मॅरेथॉन 15 वर्षांखालील गटात प्रथम स्थान.
- चौगुले स्पोर्ट्स सेंट्रलच्या 18 वर्षांखालील 7 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान.
- लायन्स क्लब डिचोलीच्या 2 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान.
- माऊंटन रन मॅरेथॉन बोरीतील 10 वर्षांखालील गटात प्रथम स्थान.
- खांडोळा कॉलेजच्या 5 किलोमीटर मॅरेथॉनच्या खुल्या गटात दुसरे स्थान.
- रन फॉर लिग अवेरनेसच्या मॅरेथॉनमध्ये प्रथम स्थान.
- शिरोडा अर्बन कॉ-ऑप. सोसायटीच्या 15 वर्षांखालील गटातील मॅरेथॉनमध्ये प्रथम स्थान.
- डॅकाथ्लोन बीच रनमध्ये 5 किलोमीटरमध्ये तिसरे स्थान.
- क्रीडा खात्याच्या ‘हर घर तिरंगा’ रनमध्ये तिसरे स्थान.
- संदीप मो. रेडकर