बहुगुणी गहू
सासर आणि माहेर यांच्यामधली सीमारेषा बदलत्या काळाने आपल्या सत्तेने पुसून टाकली आणि त्याबरोबर असलेली, जोडलेली सुखदु:खे, भावनांचे रेशीमबंधी गोफ सुटून गेले. स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये स्थित्यंतरे घडली आणि माहेरचे सुख, गोडी हरवून गेली. उरल्या फक्त आठवणी. काळ जिवंत करणाऱ्या चिरंजीव ओव्या जात्यावर बसून दळण दळताना स्त्रियांनी गायिल्या. त्यांचे प्रेमळ, समृद्ध मन त्यातून प्रकट झाले. सासरचे विलक्षण कष्टदायी आयुष्य, माहेरच्या माणसांची काहीच खबरबात नाही, जवळ मायेचे माणूस नाही... त्यामुळे रोज पहाटे जवळ बसून तिचे गुज ऐकणारे जाते तिचा जिवलग सखा झाले. पहाटेच्या नीरव शांततेत आई-वडिलांच्या आठवणींचे गाणे स्त्रियांनी गायिले. जाते संस्कृतीची विशिष्ट अशी आचारसंहिता होती. दळताना जर खुंट्याचा हात सुटला तर तो शुभशकुन मानला जायचा. कुणीतरी माहेरचे माणूस येणार याचा जणू सांगावाच असायचा. ते माहेरचे माणूस म्हणजे कोण? तर तिचा सखा भाऊराया. दळताना तिला भाऊ येताना दिसतो. मग तिचा आनंद काय वर्णावा? ती म्हणते- ‘दळन ग दळीताना खुट्ट्याचा हात सुटं, भाऊराया माझा जिवाचा सखा भेटं!’ भाऊ आला म्हणजे जणू देव धावत आला! ती मनात ठरवते की त्याच्यासाठी तूपपोळ्या करायच्या. म्हणून बारीक दळायला लागते. नंतर तिच्या प्रेमळ मनाला वाटते की एवढ्या दुरून भाऊ घरी आला आणि फक्त तूपपोळ्या नको. त्याच्यासाठी गव्हाच्या सांजोऱ्या करू. ती उठते. गव्हाला पाणी लावते. दळायला घेते. वास्तविक ओलसर गहू दळायला जड जातात, पण तिचे मन भावाच्या आगमनाने इतक्या आनंदाने भरून आले असते की ते दळण तिला भिंगरीसारखे हलके वाटते. भावाबहिणीचे हे जिव्हाळ्याचे नाते स्त्रियांनी ओव्यांमध्ये गुंफून ठेवले आहे.
अगत्य आणि आतिथ्य हे गृहस्थाश्रमाचे अलंकार आहेत. मनापासून जेवू घालणे, त्यातही पोळी-भाजी, वरणभात, कोशिंबीर असे चौरस आहाराचे ताट वाढणे ही स्त्रियांची निसर्गदत्त ओढ आहे. सद्य काळात माणसाच्या आयुष्यात सहलीला विशेष स्थान आहे. सर्व ठिकाणी हवे ते, हव्या त्या वेळेला खाणे उपलब्ध असते. त्यातही दाक्षिणात्य पदार्थ न्याहारीला मनापासून खाल्ले जातात. भाताचे विविध प्रकार असतात. तरुण वर्गाला रोटीचे आकर्षण आहे. मात्र याची गोडी फक्त दोन दिवस टिकते. नंतर मराठी माणसाला ओढ लागते ती साध्या पोळीभाजीची. त्याशिवाय त्याचे पोट भरत नाही. गव्हाच्या पिठाची साधी पोळी, पिठले किंवा एखादी भाजी हे महाराष्ट्रीय लोकांचे आवडते जेवण आहे. पोळीचे अनेक प्रकार आहेत. पोळीला चपाती हे नाव काही भागात रूढ आहे. गव्हाच्या पिठाची तेल लावून केलेली, अनेक पापुद्रे सुटणारी मऊसूत त्रिकोणी किंवा गोल पोळी वाफेसह पोटात गेली की मन भरते. शिवाय तिचा खमंग वासही सुटतो. विदर्भात फुलक्यांना पर्याय नाही. टम्म फुगलेले फुलके पचायला हलके. त्यामुळे दोन घास जास्त जातात. चपाती, दशमी, फुलका, तेलपोळी, तूपपोळी असे अनेक प्रकार आहेत.
संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे-
‘ढेकर जेवण, दिसे साचे । नाही तरी काचे । कुंथाकुंथी? हेही बोल । तेही बोल। कोरडे फोल। रुचीविण? गव्हांचिया, होती परी। फाके वरी। खाऊ नये? तुका म्हणे असे। हातीचे कांकण। तयासी दर्पण। विल्हाळक?’
तुकोबाराय म्हणतात, पोट भरल्यानंतर जी आपोआप ढेकर येते तीच खरी. बळेच कुंथून दिलेला ढेकर काही खरा नव्हे. पोटभर जेवल्यानंतरचे शब्द समाधान दर्शवणारे असतात. खोटे खोटे बळेच उच्चारलेले शब्द कोरडे असतात. नंतर महाराज गव्हाचा दृष्टांत देतात. गव्हाचे निरनिराळे पदार्थ होतात. गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या होतात. त्यातही तिखटमिठाच्या, मेथीच्या, मसाला पुरी असे प्रकार असतात. गूळ घालून गव्हाच्या पिठाचा शिरा करतात. गूळपापडी, लाडू, हुग्गी म्हणजे खीर हे पक्वान्न करतात. जाड कणकेचा रवा करून भाजलेली उकडपेंडी हा पदार्थ विदर्भात करतात. आजारी माणसासाठी सोजी करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘प्रत्येक पदार्थाची रुची अर्थात चव वेगळी असते. त्याचे महत्त्व वेगळे असते. या सर्व पदार्थांचा मुख्य घटक गहू आहे, म्हणून नुसते गहू खाऊन चालेल का? किंवा गव्हाचे पीठ म्हणजे कणिक. त्याच्या पिठाच्या फाका मारून पोट भरणार नाही. मूलाधार गहू असलेल्या पिठाची पदार्थ तयार करताना सामग्री वेगवेगळी असते. त्यामुळे गोड, तिखट चव वेगळी लागते. गहू या मध्यवर्ती धान्यावर प्रक्रिया करावी लागते तेव्हा कुठे त्याचा आनंद मिळतो. खरी ढेकर तेव्हाच येईल जेव्हा गव्हाचे चविष्ट पदार्थ खायला मिळतील. त्याप्रमाणे न जेवता दिलेली ढेकर ही तृप्तीची नसते, तर खोटी खोटी असते. अनुभवावाचून जो बोलतो त्याचे बोलणे दांभिकपणाचे असते. दांभिक आणि अदांभिक भक्त त्याच्या आचरणावरून ठरतो. हातच्या कंकणाला आरसा कशाला?
गहू आणि हरभरा यांची एक कथा आहे. एकदा गहू आणि हरभरा इंद्राच्या दरबारात गेले आणि इंद्रदेवांना म्हणाले, आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे याचा निवाडा करा. इंद्र महाशयांनी थोडा विचार केला आणि ते म्हणाले, गहू हा पौष्टिक, चविष्ट आहे खरा, परंतु तो निवडावा लागतो, नंतर दळावा लागतो. नुसती गव्हाची कणिक असूनही चालत नाही. तर ते पीठ मळावे लागते. नंतर पोळी लाटावी लागते, भाजावी लागते. एवढ्या लांबलचक प्रक्रियेनंतर ती खायला मिळते. हरभऱ्याचे मात्र तसे नाही. हरभरा तोडला, नंतर सोलला की तोंडात घातला. मस्त लागतो. त्यामुळे हरभराच श्रेष्ठ! इंद्राने दिलेल्या या न्यायाचे गव्हाला वाईट वाटले आणि दु:खाच्या भरात त्याने आपल्या उरात चाकू खूपसून घेतला. ती खूण म्हणजे गव्हावरची रेघ.
माणसाच्या शरीरात पंचप्राण असतात. सगळ्यांचे मूळतत्त्व हे प्राण असले तरी अन्न आणि जल माध्यमातून शरीरातल्या प्राणाचे पोषण होते. गहू हे धान्य प्राणाला प्राधान्य देते, तर तांदूळ अपानाला. नुसतीच गव्हाची पोळी खाल्ली तर प्राण पुष्ट होतात, परंतु अपान वायू अशक्त होतो. म्हणून पूर्वजांनी रोज वरण-भात, भाजीपोळी हा चौरस आहार घ्यावा हे ठासून सांगितले आहे.
-स्नेहा शिनखेडे