मुल्डरचेही शतक, दक्षिणआफ्रिकेची मजबूत पकड
बेडिंगहॅम, मुथुसामी यांची अर्धशतके, तैजुलचे 5 बळी, बांगलादेश 4 बाद 38
वृत्तसंस्था/ चत्तोग्राम, बांगलादेश
बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या व शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने मजबूत पकड मिळविली असून पहिला डाव 6 बाद 575 धावांवर घोषित केल्यानंतर त्यांनी बांगलादेशची स्थिती 9 षटकांत 4 बाद 38 अशी केली आहे. द.आफ्रिकेच्या डी झॉर्झी व ट्रिस्टन स्टब्स यांच्यानंतर वियान मुल्डरनेही नाबाद शतक नोंदवले तर मुथुसामीने नाबाद अर्धशतक झळकवले. दक्षिण आफ्रिकेच्या तीनही फलंदाजांचे हे पहिलेच कसोटी शतक आहे. टोनी डी झॉर्झी 177 धावा काढून बाद झाला तर मुल्डर 106 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर दिवसअखेर बांगलादेशचे 4 गडी 38 धावांत गुंडाळून द.आफ्रिकेने सामन्यावर मजबूत पकड मिळविली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावात बांगलादेशचा डावखुरा स्पिनर तैजुल इस्लामने 198 धावांत 5 बळी मिळविले. या मालिकेत सलग दुसऱ्यांदा त्याने पाच बळी मिळविले आहेत.
पहिल्या कसोटीतील शतकवीर काईल व्हेरेन स्वीप शॉट मारताना शून्यावर पायचीत झाला. तैजुलचा हा पाचवा बळी होता. पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविण्याची तैजुलची ही 14 वी वेळ आहे. नाहिद राणाने नंतर रेयान रिकेल्टनला 12 धावांवर बाद केले. 37 धावांत 4 बळी टिपल्यानंतर बांगलादेशच्या द.आफ्रिकेचा डाव झटपट संपवण्याच्या आशा बळावल्या. पण मुल्डर व सेनुरन मुथुसामीने कडवा प्रतिकार करीत त्यांचे मनसुबे उधळून लावताना या दोघांनी सातव्या गड्यासाठी अभेद्य 152 धावांची भागीदारी केल्यानंतर द.आफ्रिकेने डावाची घोषणा केली. मुल्डरने 150 चेंडूत शतक पूर्ण केले तर मुथुसामीने पहिले अर्धशतक नोंदवताना 75 चेंडूत नाबाद 68 धावा फटकावल्या. त्यात 5 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता.
बांगलादेशच्या डावाची सुरुवात मात्र खराब झाली. आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात पुन्हा अग्रस्थान मिळविणाऱ्या कागिसो रबाडाने पहिल्याच षटकात शदमन इस्लामला शून्यावर बाद केल्यानंतर पाचव्या षटकात झाकिर हसनला 2 धावांवर बाद करून बांगलादेशला 2 बाद 21 असे अडचणीत आणले. रबाडाचा सहकारी डेन पॅटरसनने मेहमुदुल हसनला 10 धावांवर मारक्रमकरवी झेलबाद केल्यानंतर केशव महाराजने नाईट वॉचमन हसन मेहमुदला 3 धावांवर त्रिफळाचीत केले. खेळ थांबला तेव्हा मोमिनुल हक 6 व कर्णधार नजमुल हुसेन शांतो 4 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक
द.आफ्रिका प.डाव 144.2 षटकांत 6 बाद 575 डाव घोषित : डी झॉर्झी 177, स्टब्स 106, मुल्डर नाबाद 105 (8 चौकार, 4 षटकार), मुथुसामी नाबाद 68 (75 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), बेडिंगहॅम 59 (78 चेंडूत 2 चौकार, 4 षटकार), मारक्रम 33, रिकेल्टन 12, अवांतर 15. तैजुल इस्लाम 5-198, नाहिद राणा 1-83. बांगलादेश प.डाव 9 षटकांत 4 बाद 38 : मेहमुदुल हसन जॉय 10, मोमिनुल हक खेळत आहे 6, शांतो खेळत आहे 4, अवांतर 13. रबाडा 2-8, पॅटरसन 1-15, केशव महाराज 1-4.