Vari Pandharichi 2025: भक्तीचे रिंगण.. विठुयाराचे स्मरण.., संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यात रंगला रिंगण सोहळा
शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा पुन्हा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला
बीड : निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...या भजनाचा नाद...टाळ मृदंगाचा अखंड गजर.. वीणेचा झंकार...अन् भक्तीचा जागर...अशा प्रसन्न वातावरणात संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा शुक्रवारी अलोट उत्साहात पार पडला.
आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर, जळगाव येथून 750 किमीचा प्रवास करून पंढरपूरमध्ये पोहोचते. सध्या पालखी बीड जिल्ह्यात आहे. गोदास्नानानंतर मुक्ताईंची पालखी गुरुवारी गेवराई मुक्कामी विसावली होती. शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा पुन्हा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
गढी जयभवानी साखर कारखाना येथे सोहळा येताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ अन् मुखी अभंग ओव्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात चिंब झाला. चोपदारांनी रिंगण लावले आणि सर्व वारकरी या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले.
मध्यभागी पालखी शोभून दिसत होती. विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, वारकरी यांनी अभंगाच्या तालावर आणि ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषात प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर स्वाराच्या व पाठोपाठ मानाच्या अश्वानेही पालखीभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली. अश्वाची दौड पूर्ण होताच भाविकांनी ही पवित्र माती मस्तकी लावत धन्यत्वाचा अनुभव घेतला.
वारकरी संप्रदायात स्त्री, पुरुष, उच्च, नीच असा कोणताही भेदभाव बाळगला जात नाही. येथे सर्व समान आहे. जनाबाई, मुक्ताबाईंचे अभंग आजही गायले जातात. वारकरी संप्रदायात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. पालखी सोहळ्यातही या अभंगांचे सूर उमटले.
मुख्य म्हणजे या पालखी सोहळ्यात महिला वारकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. गढी कारखाना येथील रिंगण सोहळ्यानंतर मुक्ताबाईंची पालखी पाडळसिंगी येथे विसावली. पालखी शनिवारी नामलगाव फाट्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. तत्पूर्वी दुपारी पालखीचा हिरापूर येथे विसावा असेल.