मुख्तार यांच्या पुत्राला दोन वर्षांची शिक्षा
आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ पाटणा
माफिया मुख्तार अन्सारी यांचा पुत्र अब्बास अन्सारी याला न्यायालयाने शनिवारी आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या शिक्षेमुळे अब्बास अन्सारी यांची आमदारकी धोक्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान द्वेषपूर्ण भाषण आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निकाल शनिवारी देण्यात आला. या प्रकरणातील पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सीजेएम डॉ. के. पी. सिंह यांनी निकालाची तारीख 31 मे निश्चित केली होती. एसआय गंगाराम बिंद यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला होता. यामध्ये सदरचे आमदार अब्बास अन्सारी यांच्यासह इतरांना आरोपी करण्यात आले होते.
3 मार्च 2022 रोजी विधानसभा निवडणुकीदरम्यान, सदर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे अब्बास अन्सारी यांनी द्वेषपूर्ण भाषण दिले होते. शहरातील पहाडपूर मैदानात झालेल्या जाहीर सभेदरम्यान प्रशासनाला निवडणुकीनंतर हिशेब चुकता करण्याची आणि त्यानंतर त्यांना धडा शिकवण्याची धमकी स्टेजवरून देण्यात आली होती. या प्रकरणात अब्बासचा सहकारी मन्सूर अन्सारी यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 120 ब अंतर्गत त्याला सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.