फोर्ब्सच्या अब्जाधिशांच्या भारतीय यादीत मुकेश अंबानी अव्वल
वृत्तसंस्था/मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी फोर्ब्स 2024 च्या यादीत भारताच्या 100 अब्जाधिशांच्या यादीत सर्वात आघाडीवरचे पहिले स्थान प्राप्त केले आहे. मागील एक वर्षात त्यांच्या संपत्तीत 27.5 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. आता त्यांची एकंदर संपत्ती 119.5 अब्ज डॉलर्सची झाली आहे. अशाप्रकारे अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति तर बनले आहेतच पण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारे झाले आहेत. जागतिक स्तरावर ते आता 13 व्या स्थानावर आहेत.
उद्योजक मुकेश अंबानी यांनी अलीकडेच रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळीसाठी बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे कॉर्पोरेट जगतात त्यांचे स्थान आता अधिक मजबुत झाले आहे. अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानी हे 2024 च्या यादीत वरचे स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या संपत्तीत 48 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर्सची झाली आहे. यावर्षी भारतातील धनाढ्यांच्या संख्येत मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. यामध्ये पहिल्यांदाच आघाडीवरच्या 100 श्रीमंत व्यक्तिंच्या संपत्तीचे मूल्य 1 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक दिसून आले आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार यांची संपत्ती 1.1 ट्रिलीयनवर पोहचली आहे, जी 2023 मध्ये 799 अब्ज डॉलर इतकी होती. शेअरबाजाची मजबुत कामगिरी वाढीसाठी कारणीभूत मानली जात आहे.
ओपी जिंदल समुहातील सावित्री जिंदल या फोर्ब्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचल्या आहेत. त्यांची संपत्ती 43.7 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. त्यांचे पुत्र सज्जन जिंदल एमजी मोटरसोबत भागीदारी करुन आपले नाव उंचावत आहेत. चौथ्या स्थानावर शिव नाडर असून त्यांची एकूण संपत्ती 40.2 अब्ज डॉलर्सची झाली आहे. पाचव्या स्थानावर सनफार्मास्युटिकल्सचे संस्थापक दिलीप संघवी हे राहिले आहेत.