मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत टॉप टेनमध्ये
नेटवर्थ 9.45 लाख कोटी रुपयांवर पोहचले
नवी दिल्ली :
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 114 अब्ज डॉलर (सुमारे 9.45 लाख कोटी रुपये) झाली आहे.
गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांना मागे टाकून त्यांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. फ्रेंच अब्जाधीश आणि लुई व्हिटॉन मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट या यादीत अव्वल स्थानावर आहेत. अरनॉल्टची एकूण संपत्ती 222 अब्ज डॉलर्स (सुमारे 18.60 लाख कोटी रुपये) आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आहेत. त्यांची एकूण संपत्ती 16.74 लाख कोटी रुपये इतकी झालीआहे.
अंबानींची संपत्ती 5 वर्षात तिप्पट
मुकेश अंबानी यांची संपत्ती 5 वर्षात 36 बिलियन डॉलर (सुमारे 2.89 लाख कोटी रुपये) वरून 114 बिलियन डॉलर (सुमारे 9.45 लाख कोटी रुपये) पर्यंत वाढली आहे. म्हणजे 5 वर्षात अंबानींची एकूण संपत्ती दुपटीहून अधिक वाढली आहे. व्यवसायाचा प्रसार ऊर्जेपासून रिटेल आणि डिजिटल सेवांपर्यंत झाला आहे.
रिलायन्स ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी आणि सर्वात फायदेशीर कंपनी आहे. 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल मूल्य असलेली ही देशातील पहिली कंपनी आहे.
गौतम अदानी 16 व्या स्थानी
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी फोर्ब्सच्या रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 84 अब्ज डॉलर्स (सुमारे 69.6 लाख कोटी रुपये) आहे. या यादीत टॉप 20 मध्ये फक्त 2 भारतीय आहेत.