मुडा अध्यक्ष मरिगौडा यांचा राजीनामा
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय आणि म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाचे (मुडा) अध्यक्ष मरिगौडा यांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. राज्य राजकारणात वादळ निर्माण झालेल्या मुडाच्या भूखंड प्रकरणामुळे सिद्धरामय्या अडचणीत आले आहेत. दरम्यान, मरिगौडा यांनी मुडाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे. बेकायदा भूखंड वाटप प्रकरण उघडकीस येताच मरिगौडा यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी माझ्यावर कोणताही दबाव नाही. आरोग्य चांगले नसल्याकारणाने राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यांनी विकाससौधमधील नगरविकास खात्याचे सचिव दीपा चोळण यांच्याकडे राजीनामापत्र सुपूर्द केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन राजीनामा देत असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना मरिगौडा म्हणाले, राजीनामा देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली होती. माझी प्रकृतीही चांगली नाही. त्यामुळे नगरविकास खात्याच्या सचिवांकडे राजीनामापत्र दिले आहे. माझ्यावर राजीनाम्यासाठी कोणताही दबाव नाही. मुडा प्रकरणी तपास सुरू आहे. तपासातून सत्य उघडकीस येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भूखंड मंजुरीसंबंधी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर कोणताही आणला दबाव नाही. सिद्धरामय्या हेच आमचे नेते आहेत. मागील 40 वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. तालुका, जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून त्यांनी माझी नेमणूक केली होती. मला दोन वेळा अर्धांगवायूचा झटका आला. आरोग्य उत्तम नसल्याने मुडाचे अध्यक्षपद सांभाळणे कठीण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.