ओढ्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी अंगाला माखला चिखल
पलूस :
पलूस नगरपरिषदेने आक्रमक भूमिका घेत शहरातील अतिक्रमण मोहीम राबवली. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण निघाले. परंतु शहरातून जाणाऱ्या ओढ्यावरील अतिक्रमण न काढल्यामुळे पावसाचे पाणी बौध्द वासाहतीमधील नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान देखील झाले आहे. याची भरपाई नगरपरिषदेने द्यावी तसेच गावातील अतिक्रमण काढण्यासाठी सिंघम स्टाईने राबवलेली मोहीम गाव ओढ्यावरील अतिक्रमण काढण्याण्यासाठी राबवावी, अशी मागणी दलित सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांनी करत यांनी लोकांच्या घरात शिरलेल्या पाण्याचा गाळ अंगाला माखून लक्ष वेधी आंदोलन केले.
अंगाला चिखल व गाळ माखलेल्या अवस्थेत पलूस नगपरिषदेच्या आवारात येवून त्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरातील ओढे नाले भरून वाहत होते. गावातील प्रमुख असणाऱ्या गाव ओढयाला देखील पूर आला. याचे पाणी पात्रा बाहेर जाऊन नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे कुटुंबाना स्थालांरीत व्हावे लागले. अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होवू शकते. वारंवार घरात पाणी शिरल्याने बौध्द वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घराचे नुकसान होत आहे. परवा झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. याची दखल कुणीही घेतली नाही. ओढ्यावरील अतिक्रमण झाल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरत असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
शहरात अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतो. मात्र कधी असे पाणी आले नाही. अलिकडच्या काळात गाव ओढ्याच्या पात्रावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे ओढा पात्राची रुंदी कमी झाल्याने पाणी पात्रा बाहेर येत आहे. पलूस नगरपरिषदेने गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हाटवले. त्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र ओढ्यावरील अतिक्रमण हे बौध्द वसाहत येथे राहणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठणारे आहे. त्यामुळे नगरपरिषदेने तात्काळ येथील अतिक्रमण काढावे. ओढा पात्राची रूंदी वाढवल्यास नागरिकांचा प्रश्न मिटू शकतो. मात्र नगरपरिषद ओढा पात्रावर वाढलेली झुडपे तोडून व कचरा बाजूला काढून फक्त स्वच्छता करते. अतिक्रमण तसेच सोडून दिले जाते. अतिक्रमण मूळापासून काढल्यास भविष्यातील प्रश्न मिटू शकतो. रामानंदन पाटील, प्रशांत लेंगरे, सागर सुतार व अन्य राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.