Kolhapur News | कागलमध्ये मधमाशांचा कहर! तिघे गंभीर, दहा जण जखमी
निपाणी वेस परिसरात मधमाशांचा हल्ला
कागल : कागल शहरातील निपाणी वेस परिसर आज सकाळी अक्षरशः दहशतीच्या छायेत जागा झाला. अचानक मधमाशांच्या प्रचंड थव्याने परिसरात हल्ला चढवला असून या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले, तर दहा जणांना चावे घेण्यात आले आहेत.
जखमींमध्ये मनाली सौरभ पाटील (३२), बेळगावहून आलेले बाबूराव मारूती आवळे (८०) तसेच मदतीला धावलेल्या प्रमोद कृष्णा कांबळे (४०) यांचा समावेश आहे. मनाली पाटील या रस्त्याने जात असताना हजारोंच्या संख्येने मधमाशांनी अचानक त्यांच्या अंगावर तुटून पडत त्यांना अक्षरशः वेढा घातला. चेहरा, हात, पाठीवर सतत डंख केल्यामुळे त्या किंचाळत धावत होत्या.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र मधमाशांच्या प्रचंड थव्यामुळे तेही काही काळ हतबल झाले. तब्बल १५ मिनिटे सलग हल्ला सुरू राहिल्यानंतर नागरिकांनी मशाली व कडबा पेटवून धूर निर्माण केला. त्यानंतर मधमाशांचा रोष कमी झाला आणि लोकांनी जखमींची सुटका केली.
मनाली पाटील यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात व तेथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. वृद्ध नागरिकांसह इतर जखमींवर देखील उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या घटनेने निपाणी वेस परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.