मुतगे गावातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
ग्रा. पं.कडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष : प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या ऊग्णांची-विद्यार्थ्यांची गैरसोय
वार्ताहर /सांबरा
मुतगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी मराठी व कन्नड प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने ऊग्णांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सदर रस्ता करण्याबाबत ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने गैरसोयीत भर पडली आहे. त्यामुळे या रस्त्याला कोण वाली आहे की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गावातील सरकारी मराठी व कन्नड प्राथमिक शाळेला जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे अद्याप काँक्रिटीकरण न केल्याने सध्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर रस्ता करण्यात यावा, याबाबत मागील तीन वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून रस्ता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये मुतगे गावच्या हद्दीत नवीन नागरी वसाहत वाढली आहे.
ग्रामपंचायतीचे पीडीओ या नवीन वसाहतीकडेच जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्नही सध्या उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायतीकडून गावातील समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काँक्रीटीकरण करावे, अशी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करण्यात आली आहे. दरवेळेप्रमाणे थातूरमातूर आश्वासन देऊन वेळ मारून नेण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना चिखलातून वाट शोधत शाळा गाठावी लागत आहे. तसेच याच रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे. या ठिकाणी अनेक गावचे ऊग्ण दररोज येत असतात. मात्र रस्त्याच्या झालेल्या दुर्दशामुळे त्यांची ही गैरसोय होत आहे. त्यामुळे याकडे आतातरी ग्रामपंचायत लक्ष देणार काय, असा सवाल ग्रामस्थांतून विचारण्यात येत आहे.
पीडीओचे गावापेक्षा नागरी वसाहतीकडेच लक्ष
रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे यासाठी दर बैठकीमध्ये पाठपुरावा करत आहे. मात्र दरवेळेला काही ना काही कारण सांगून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पीडीओ गावापेक्षा नवीन नागरी वसाहतीकडेच जास्त लक्ष देत असल्याने रस्त्याची समस्या गंभीर बनली आहे.
-सुधीर पाटील ग्रा. पं. सदस्य
तीन-चार वर्षांपासून पाठपुरावा
सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत असून याबाबत ग्रामपंचायतमध्येही कळविण्यात आले आहे. तरीही रस्त्याच्या काँक्रिटीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून शाळा गाठावी लागत आहे.
-किरण पाटील, अध्यक्ष एसडीएमसी