सदाशिवनगर स्मशानभूमी बनली अडगळीचे ठिकाण
आवारात चिखलाचे साम्राज्य : मोडके साहित्यही टाकून देण्यात आल्याने नाराजी
बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमीत महापालिकेची कचरावाहू वाहने पार्क करण्यासह इतर प्रकारचे साहित्य टाकले जात आहे. यामुळे स्मशानभूमी आहे की कचरा डेपो? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. सतत ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे स्मशानभूमी आवारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिकेने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालून स्मशानभूमीची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीच्या स्वच्छतेबाबत महापालिकेच्या बैठकांमध्ये अनेक वेळा चर्चा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याच प्रकारचे काम होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सदाशिवनगर स्मशानभूमी आवारात यापूर्वी मोबाईल टॉयलेट उभे केले जात होते. मात्र, त्याला आक्षेप घेण्यात आल्याने तेथून मोबाईल टॉयलेट हटविण्यात आले आहे. मात्र, महापालिकेची कचरावाहू व इतर प्रकारची वाहने स्मशानभूमी आवारात पार्क केली जात आहेत. इतकेच नव्हे तर इतर प्रकारचे मोडके साहित्य देखील स्मशानभूमी आवारातच आणून टाकले जात आहे.
त्यामुळे सर्वत्र अडगळ निर्माण झाले आहे. या ठिकाणी नव्याने शेड उभारहावा या मागणीसाठी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर शेड उभारण्यात आली आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीत दररोज अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. मात्र, त्या ठिकाणी सोयीपेक्षा गैरसोयीच अधिक आहेत. कचरावाहू वाहनांची सातत्याने ये-जा असल्याने सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यातूनच नागरिकांना वाट शोधावी लागत आहे. त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये जुन्या ट्यूबलाईट, पाईप व इतर साहित्य टाकून देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मोडके साहित्य तसेच पडून असले तरी त्याची उचल करून स्वच्छता करण्यात आलेली नाही. जुनी बंद पडलेली वाहने देखील तशीच त्या ठिकाणी थांबून आहेत. या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. वाहनांच्या सततच्या ये-जा मुळे निर्माण झालेल्या चिखलावर खडी किंवा चिपिंग टाकण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मनपा आयुक्त किंवा महापौरांनी याकडे लक्ष घालून सदाशिवनगर स्मशानभूमीतील समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली जात आहे.