‘मना’चे श्लोक’ चित्रपटात मृण्मयी
एक हृदयस्पर्शी गोष्ट लवकरच रुपेरी पडद्यावर येत असून याचे नाव ‘मना’चे श्लोक’ आहे. या चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले असून यातून ‘मना’ आणि ‘श्लोक’ यांच्यातील नात्याचा अंश झळकतो. चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील भावना हे त्यांच्या संवादापेक्षा बरेच काही सांगून जातात. या दोघांच्या नात्याचं गूढ काय आहे? ते प्रेमात आहेत की एखाद्या निर्णयाच्या उंबरठ्यावर? लग्न, नातेसबंध आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनांमध्ये कोणते मतभेद आहेत का प्रश्नाची उत्तरे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहेत. या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसोबत राहुल देशपांडे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृण्मयीनेच केले आहे. ‘मना’चे श्लोक ही फक्त दोन पात्रांची गोस्ट नाही तर ती आपल्या सगळ्यांच्या मनातील विचारांची झलक आहे. नाती, संभ्रम, मतं हे सगळं आपल्याला आतून स्पर्शून जातं. ही कहाणी बघताना प्रेक्षकांना आपलं काहीतरी आठवेल असे मृण्मयीने म्हटले आहे. मना’चे श्लोक हा चित्रपट 1 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.