For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृणाल हेब्बाळकरांचा विजय निश्चित

10:53 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृणाल हेब्बाळकरांचा विजय निश्चित
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विश्वास : गॅरंटी योजनांमुळे मतदारांचा प्रतिसाद

Advertisement

बेळगाव : राज्य आणि राष्ट्र पातळीवर काँग्रेसने केलेला विकास, जारी केलेल्या विविध योजना आणि करण्यात आलेल्या विकासकामांची जनतेकडून मुक्तकंठाने प्रशंसा केली जात आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दि. 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू करून त्या बोलत होत्या. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये प्रचार केला जात आहे. काही तालुक्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू करण्यात आला आहे. सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे. जिल्हा पंचायत मतदारसंघानुसार तर काही ठिकाणी विभागवार प्रचार हाती घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातील स्थानिक आमदारांकडून आणि पक्षाच्या नेत्यांनी पहिल्या टप्प्यातील कार्यकर्त्यांची सभा घेतली आहे. यानंतर जि. पं. स्तरावर बैठक घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. काही ठिकाणी रोड शो केले आहेत. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आपल्या कार्यक्षेत्रानुसार प्रचार करत आहेत. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करून गावागावात मिरवणूक काढली जात आहे. मिळणारा प्रतिसाद पाहिल्यास काँग्रेस उमेदवाराला विजय मिळण्यात संशय नाही, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाकडून राबविण्यात आलेल्या गॅरंटी योजनांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दि. 15 एप्रिल रोजी काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर पुढील प्रचार केला जाणार आहे. यासाठी राज्यस्तरीय नेते प्रचाराला येणार आहेत, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.