Kolhapur Breaking : कोल्हापूरात महाराज विरुद्ध मंडलिक होणार लढत! उमेदवारीबाबत खासदार संजय मंडलिक यांना ग्रीन सिग्नल
सोमवारी होणार अधिकृत घोषणा; श्रीमंत शाहू छत्रपतींच्या प्रचारामध्ये ‘महाविकास’ने घेतली आघाडी; संपूर्ण राजघराणे प्रचार मैदानात; सोशल मिडियाच्या माध्यमातूनही महाराज एक पाऊल पुढे
कृष्णात चौगले कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला असून सोमवारी अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती विरुद्ध खासदार संजय मंडलिक अशी लढत होणार आहे. दरम्यान शाहू महाराजांच्या प्रचार दौऱ्यामध्ये ‘महाविकास’मधील घटक पक्षांनी आघाडी घेतली असून सोशल मिडियाच्या प्रचारामध्येही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रचार नियोजनासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची सोमवारी बैठक होणार आहे.
महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीची चार दिवसांपूर्वी अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा शिवसेनेचे स्थानिक नेते आणि राजघराण्यांवर प्रेम करणाऱ्या जनतेची राजेंना शुभेच्छा देण्यासाठी राजवाड्यावर रिघ लागली आहे. प्रचाराचे नियोजनदेखील युद्धपातळीवर सुरु आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगीताराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे आदी राजवाड्यातील सर्व सदस्य प्रचारयंत्रणेत उतरले आहेत. प्रत्येक सदस्याने आपआपल्या पातळीवर प्रचाराची जबाबदारी घेतली असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार ऋतुराज पाटील, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी प्रत्यक्ष प्रचारयंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुक्यापासून प्रचारदौरे सुरु केले असून पूर्ण मतदारसंघाच्या प्रचारासाठी त्यांनी आराखडा तयार केला आहे. शिवसेना उबाठा गटाकडूनही त्यांच्या पातळीवर प्रचाराचे नियोजन सुरु आहे. दरम्यान शनिवारी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी श्रीमंत शाहू छत्रपतींना पाठींबा जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीच्या ताकदीमध्ये आणखी भर पडली आहे.
उमेदवार जाहीर करण्याबरोबरच प्रचारामध्येही ‘महाविकास’ने आघाडी घेतली असली तरी महायुतीकडून उमेदवार जाहीर केला नसल्यामुळे लढत कशी होणार ? अशी मतदारसंघात चर्चा रंगली होती. महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांचेच नाव आघाडीवर असले तरी अधिकृत घोषणा झाली नसल्यामुळे मंडलिक यांनी गेली चार दिवस मुंबईमध्ये तळ ठोकला होता. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी दिल्ली येथे भाजपच्या कोअर कमिटीकडे पाठवली असल्यामुळे त्यांच्याकडून नेमका कोणता निर्णय येतो ? याकडे शिंदे गटाच्या सर्वच खासदारांचे लक्ष होते. पण शनिवारी खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे रविवारपासून महायुतीच्या प्रचाराला वेग येणार आहे. मंडलिक यांच्या प्रचारासाठी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही स्वतंत्र यंत्रणा राबविली जाणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर प्रचारयंत्रणेची प्रमुख धुरा दिली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रचारयंत्रणा राबविली जाणार आहे. यामध्ये माजी आमदार के.पी.पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजपची संपूर्ण पक्षीय यंत्रणा ताकदीने खासदार मंडलिक यांच्या प्रचारात उतरवली जाणार आहे. तसेच आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह ‘जनसुराज्य’ची शक्ती मिळणार आहे. त्यामुळे राजे विरुद्ध मंडलिक असा चुरशीचा सामना पहावयास मिळणार आहे.
हातकणंगलेत शेट्टी विरुद्ध माने, ‘महाविकास’ चा निर्णय गुलदस्त्यात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून प्रचारदौरे गतीमान केले आहेत. त्यांच्याविरोधात महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांनी पुन्हा दंड थोपाटले असून सोमवारी त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल. शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेतली असली तरी आपल्याला महाविकास आघाडीचा पाठींबा मिळेल असा त्यांना विश्वास आहे. काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांनीही महाविकास आघाडीकडून हातकणंगलेत स्वतंत्र उमेदवार देण्याऐवजी शेट्टी यांनाच पाठींबा दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. पण शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवारी देण्याबाबत अद्याप चाचपणी सुरु आहे.
एप्रिलच्या उत्तरार्धात कोल्हापूरात होणार मोदींची सभा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिल्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. थेट राजघराण्यातच उमेदवारी दिल्यामुळे प्रचारदौऱ्याची संकल्पनाही बदलावी लागणार आहे. त्यामुळे मंडलिक यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या जिह्यातील स्थानिक नेत्यांबरोबरच राज्यातील नेतेही कोल्हापूरात येणार असल्याची चर्चा आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरात सभा घेण्याचे महायुतीकडून नियोजन सुरु असल्याचे समजते.