खासदार प्रज्ज्वल निजदमधून निलंबित
हुबळीत पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत निर्णय : माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना ‘कारणे दाखवा’
प्रतिनिधी/ बेंगळूर
लैंगिक शोषण आणि कथित चित्रफितप्रकरणी हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना निजदमधून निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय मंगळवारी हुबळीत पार पडलेल्या निजद कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
हुबळीत निजदच्या कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष जी. टी. देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी प्रज्ज्वल यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर पक्षाध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या शिफारसीवरून निलंबनाच्या कारवाईचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला. कार्यकारिणी बैठकीनंतर कुमारस्वामी आणि जी. टी. देवेगौडा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत निर्णयांची माहिती दिली. याप्रसंगी बोलताना कुमारस्वामी यांनी, व्हायरल व्हिडिओंमुळे पक्ष आणि नेतृत्वाची प्रतिष्ठा धोक्यात येत आहे. राज्य सरकारने चित्रफित प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविला आहे. आपल्याकडून तपासासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. कोणाचाही बचाव करण्याचा प्रश्नच नाही. एखाद्या वेळेत चौकशीत प्रज्ज्वल दोषी आढळल्यास पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा दिला. आमच्या पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-निजद युतीचा पराभव करण्याच्या उद्देशाने हे कारस्थान रचण्यात आले आहे. तपासातून सत्य बाहेर येईल, असेही कुमारस्वामी म्हणाले.
तीन दिवसांत अहवाल द्या!
लैंगिक शोषणासंबंधीच्या व्हिडिओ प्रकरणी तीन दिवसात अहवाल सादर करा, अशी सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांना दिली आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगानेही पोलीस महासंचालक आणि एसआयटीच्या प्रमुखांना पत्र पाठवून व्हिडिओंचा प्रसार रोखावा. व्हिडिओ कोणी आणि कोठून लिक केल्या, याचा फौजदारी खटल्यांतर्गत तपास करावा, अशी सूचना दिली आहे.
चौकशीला हजर राहण्याची पिता-पुत्राला नोटीस
लैंगिक शोषणाच्या चित्रफिती व्हायरल झाल्याने हासनचे निजद खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंगळवारी एसआयटीने प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच. डी. रेवण्णा यांना नोटीस बजावली आहे. नोटीस पोहोचल्यानंतर 24 तासांत चौकशीला हजर राहण्याची सूचना पिता-पुत्राला देण्यात आली आहे. चौकशीला हजर न झाल्यास पुढील कारवाई करावी लागेल, असा उल्लेखही नोटिसीत करण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते.
तपास करण्यासाठी 18 अधिकाऱ्यांची टीम
लैंगिक शोषण आणि चित्रफित प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीने 18 जणांचे पथक नेमले आहे. यात महिला अधिकाऱ्यांचा अधिक समावेश करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये असणाऱ्या महिलांची चौकशी करण्याबरोबरच प्रकरणाचा विस्तृत तपास करण्यात येणार आहे.
चित्रफित काँग्रेस नेत्यांकडे दिली नाही : कार्तिक
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कथिक अश्लील चित्रफित प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्ज्वल यांचा माजी कारचालक कार्तिक याने अज्ञात स्थळाहून एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्याने आपण व्हिडिओची पेनड्राईव्ह काँग्रेस नेत्यांकडे दिली नाही. वकील देवराजेगौडा यांच्याकडे दिली होती. मी 15 वर्षे प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कुटुंबाचा कारचालक म्हणून काम केले आहे. जमिनीच्या वादावरून माझ्या कुटुंबीयांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे मी वर्षभरापूर्वी काम सोडले. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे न्यायालयीन लढ्यासाठी वकील देवराजेगौडा यांच्याजवळ गेलो. माझ्याजवळ असणाऱ्या अश्लील चित्रफिती व्हायरल करू नये, यासाठी प्रज्ज्वल यांनी न्यायालयाकडून स्थगिती आणली होती. तेव्हा चित्रफिती कोणालाही दाखवणार नाही, असे देवराजेगौडा यांनी सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून चित्रफितीची एक कॉपी दिली. मात्र, त्यांनी चित्रफित व्हायरल केली. चित्रफित त्यांनी स्वार्थासाठी वापरली की कोणाला दिली, हे माहित नाही, असा आरोप कार्तिकने केला आहे. काँग्रेस नेत्यांवर विश्वास नसल्याने चित्रफितींची पेनड्राईव्ह त्यांच्याकडे दिली नाही, असेही कार्तिकने स्पष्ट केले.
भाजपश्रेष्ठींना पत्र पाठविले होते : देवराजेगौडा
हासनमधून प्रज्ज्वल यांना तिकीट देऊ नये, असे आधीच भाजपश्रेष्ठींना पत्र पाठविले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनाही व्हॉट्सअॅपद्वारे माहिती दिली होती. मात्र, कामाच्या ताणामुळे त्यांनी त्याकडे लक्ष दिले नसावे. दरम्यान, निजदने प्रज्ज्वल यांना तिकीट दिले, असे हासनचे भाजप नेते व वकील देवराजेगौडा यांनी म्हटले आहे. मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी, 2023 मध्ये चित्रफित प्रकरण चर्चेत आले होते. त्यावर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी न्यायालयातून स्थगिती आणली होती. तेव्हा कार्तिकने माझी भेट घेत वकिलपत्र स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा मी प्रज्ज्वल यांच्या चित्रफिती पाहिल्या होत्या. कार्तिकजवळ अनेक चित्रफिती होत्या. मी त्या व्हायरल केल्या नाहीत. डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेस नेत्यांकडे दिल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकरणात महान नेत्याचा हात : कुमारस्वामी
पेनड्राईव्ह प्रकरणात महान नेत्याचा हात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर केला. आमच्याजवळही काही व्हिडिओ आहेत. पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. येथे कोणाचाही बचाव करण्याचा प्रश्नच नाही. सरकारने तपास करावा, चूक केलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे, असेही कुमारस्वामी म्हणाले.
पेनड्राईव्ह प्रकरणाशी संबंध नाही : शिवकुमार
हासनमधील पेनड्राईव्ह प्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. अशा प्रकरणांमध्ये मी राजकारण करण्याचे मला स्वारस्य नाही. खिशात पेनड्राईव्ह आहे, असे सांगून घाबरविण्याचे काम मी करत नाही. कोणताही विषय असेल तर विधानसभेत येऊन बोलण्याचे आव्हान कुमारस्वामी यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे.
हुबळीत निजद-काँग्रेस कार्यकर्त्यांत हंगामा
दरम्यान, मंगळवारी हुबळीमध्ये काँग्रेस आणि निजद-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुमारस्वामी असलेल्या हॉटेलसमोर निदर्शने करत हॉटेलला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेसच्या आंदोलकांना निजद कार्यकर्त्यांनी रोखले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी आणि हाणामारी झाली. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणले.