बेळगाव विमानतळाचा दर्जा वाढविण्याच्या खासदार जगदीश शेट्टर यांच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत विचारविनिमय
बेळगाव : बेळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक डिमांड सर्व्हे करण्याची सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली आहे. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विमानतळ प्राधिकरणाचे त्यागराजन आदी उपस्थित होते. बेंगळूर व मंगळूरनंतर बेळगाव विमानतळ हे राज्यातील तिसरे मोठे विमानतळ आहे. सध्या या विमानतळावरून देशभरातील विविध शहरांना रोज दहा विमाने सेवा पुरवतात. महाराष्ट्रातील कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्याशेजारील बागलकोट, विजापूर, धारवाड जिल्ह्यांतूनही प्रवासी या विमानतळावर येतात, असेही जगदीश शेट्टर यांनी सांगितले. या विमानतळाचा दर्जा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून वाढविण्यासाठी नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे डिमांड सर्व्हे करून विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना जगदीश शेट्टर यांनी केली.