खासदार जगदीश शेट्टर पंतप्रधानांच्या भेटीला
बेळगावबाबत विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या विविध प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी खासदार जगदीश शेट्टर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार, उडान-3 योजनेचा कालावधी वाढवावा, यासह विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांनी लवकरात लवकर बेळगावसाठी सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांच्या कार्यपद्धतीबाबत पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले. खासदारांनी त्यांना हुबळी साहित्य भांडारातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘टेम्पल ट्रेझर्स अ ट्रीप थ्रू टाईम’ हे पुस्तक भेट दिले. सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याबद्दल खासदारांनी पंतप्रधानांचा सत्कार केला. याच धर्तीवर रामदुर्ग तालुक्यातील ऐतिहासिक शबरीकोळ्ळ या स्थळाचा विकास करण्याची मागणी करण्यात आली.
उडान-3 अंतर्गत बेळगाव विमानतळाचा समावेश झाल्याने विमान प्रवाशांना स्वस्त दरात विमानप्रवास करता येत होता. परंतु या योजनेचा कालावधी संपल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेळगाव विमानतळाचा उडानअंतर्गत समावेश करून कालावधी वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर बेंगळूर-धारवाड वंदेभारत एक्स्प्रेसचा विस्तार बेळगावपर्यंत करावा, अशीही मागणी पंतप्रधानांकडे खासदारांनी केली.