सीमाभागातील बेरोजगार तरुणांसाठी शिवजयंती दिनी रोजगार मेळावा घ्या
खासदार धैर्यशील माने यांना म. ए. समितीचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरुणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार मेळावा घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबाबतही चर्चा करण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी निपाणी येथे युवा समितीच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार मेळावा घेण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांच्यामार्फत तत्कालिन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांना प्रतिसाद देऊन 19 फेब्रुवारी 2023 रोजी देवचंद कॉलेज, अर्जुननगर, निपाणी येथे रोजगार मेळावा झाला. पाच हजारांहून अधिक बेरोजगारांनी याला हजेरी लावली होती. 1700 हून अधिक तरुणांना नोकरी देण्यात आली.
याच धर्तीवर सीमाभागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा एकदा रोजगार मेळावा घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निपाणी विभागाचे जयराम मिरजकर, डॉ. अच्युत माने, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, निपाणी युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, सचिन दळवी, रमेश कुंभार यांसह इतर उपस्थित होते.