सीबर्ड प्रकल्पासंदर्भात खासदार हेगडेंची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा
कारवार : कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दिल्ली येथील कार्यालयात जाऊन येथून जवळच्या सीबर्ड नाविक दल प्रकल्प संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. कारवार आणि अंकोला तालुक्यांच्या किनारपट्टीवर दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठा आणि भारतीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखला जाणारा सीबर्ड प्रकल्प आकार घेत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा आकार घेत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कारवार आणि अंकोला तालुक्यातील अनेक खेड्यातील चार हजारहून अधिक कुटुंबीयांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. प्रकल्प उभारणीसाठी जमीन संपादन करून आणि प्रकल्प उभारणीला तीन ते साडेतीन दशकांचा कालावधी उलटूनही, सरकारला विस्थापितांच्या समस्या सोडविण्यात अद्याप यश आलेले नाही.
जमीन गमावलेल्या कुटुंबीयांना अद्याप योग्य ती नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. विस्थापितांचे समाधानकारक पुनर्वसन करण्यात आलेले नाही. विस्थापित कुटुंबातील युवक-युवतींसह स्थानिकांना प्रकल्पाच्या सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यांच्या व्यथा आणि समस्यांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी खासदार हेगडे यांनी मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा केली, असे सांगण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पासाठी जमीनसह अन्य बाबींचा त्याग केलेल्या कुटुंबांना शिल्लक नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी केली गेली. अनेक वर्षे झाली तरी विस्थापित कुटुंबीयांच्या फाईल्सची विल्हेवारी झालेली नाही प्रलंबित फाईल्सची प्राधान्यतेवर विल्हेवारी लावण्याची मागणी हेगडे यांनी राजनाथ सिंग यांच्याकडे केली. प्रकल्प उभारणीच्या सुरुवातीला सरकारने जमीन गमावलेल्या कुटुंबातील आणि स्थानिक बेरोजगारांना प्रकल्पाच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. तथापी अद्यापतरी हे आश्वासन कागदोपत्रीच राहिले आहे. किमान आता तरी त्या आश्वासनाची पूर्तता संरक्षण मंत्रालयाने करण्याची मागणी खासदारांनी केली. प्रकल्पातील विविध पदांच्या भरतीसाठी संरक्षण मंत्रालयाकडून दूरवरच्या मुंबई सारख्या शहरामध्ये परीक्षा घेतल्या जातात. यामुळे येथील परीक्षार्थी एक तर परीक्षेला हजर राहू शकत नाहीत किंवा परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याकरीता भरती परीक्षा कारवारमध्ये घेण्याची मागणी हेगडे यांनी केली.
राजनाथ सिंग यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
चर्चेनंतर मंत्री राजनाथ सिंग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सीबर्ड संदर्भातील समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याच्या सूचना केल्याचे सांगण्यात आले.