खासदार धनंजय महाडिक यांना आक्षेपार्ह विधान भोवले
कोल्हापूर :
फुलेवाडी येथील महात्मा फुले युवक मंडळ येथे शनिवारी झालेल्या राजकीय प्रचारसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महिलाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची निवडणूक विभागाने दखल घेतली आहे. या विधानाबाबत कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांनी खासदार महाडिक यांना तात्काळ खुलासा करण्याची नोटीस पाठवली आहे.
भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ शनिवारी फुलेवाडी येथे सभा झाली. या सभेत खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महिलाबाबत आक्षेपार्ह विधान केले. आमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा. आम्ही त्यांची व्यवस्था करतो अशा प्रकारे केलेल्या विधानाचे व्हिडीओ शनिवारी रात्रीच सर्वत्र व्हायरल झाले. महाडिक यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभर वादंग उठले. यामुळे निवडणूक विभागाला दखल घेणे भाग पडले. विधानसभ निवडणुकीची आचार संहिता 15 ऑक्टोंबर, 2024 पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - 2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस कोल्हापूर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
त्यांचे फोटो काढून घ्या, त्यांची नावे लिहून घेवून आमच्याकडे द्या आम्ही व्यवस्था करतो असे वक्तव्य केले होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी बाबत खुलासा करताना जाहिर माफी मागीतली होती. मात्र खासदार धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली. रविवारी सकाळी दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या भरारी पथकाच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 171 (2) अ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. मतदारांवर प्रभाव टाकणे, त्यांच्यावर दडपण आणणे अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी फुलेवाडी येथील सभेत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार, माजी नगरसेविका संध्या घोटणे, कोल्हापूर काँग्रेस युवती शहर अध्यक्ष अंजली जाधव, माधुरी जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
दक्षिण विधानसभा मतदार संघातील भरारी पथकाने दिलेल्या तक्रारीनुसार खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर याचा तपास करुन न्यायालयात अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.