तुळशी विवाहाचे साहित्य बाजारात
फुलांसह पुजा साहित्याच्या दरात वाढ
कोल्हापूर :
दिवाळी झाल्यानंतर येणाऱ्या कार्तिक एकादशीच्या दुसऱ्यादिवशी तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. उद्या (दि. 13) रोजी तुळशी विवाह असल्याने बाजारात पुजेचे साहित्य दाखल झाले आहे. फुलांची आवक कमी असल्याने पुजेच्या साहित्यासह फुलांच्या दरात वाड झाली आहे.
परंपरेनुसार भगवान विष्णूने शालिग्राम किंवा श्रीकृष्ण आवतारात देवी तुळशीशी विवाह केला. हिंदू ग्रंथानुसार तुळशीमाता लक्ष्मीचा आवतार आहे. त्यामुळे कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच व्दादशीला विष्णू आणि तुळशीचा विवाह विधीपूर्वक केला जातो. उद्या ( दि. 13) नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.29 ते संध्याकाळी 7.53 पर्यंत विवाह मुहुर्त आहे. या विवाहासाठी लागणारे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. काळे मनी, टिकली, ब्लाऊज कापड, चिंच, आवळा, बांगड्या, फनी 20 रूपयांना, भेंड बत्ताशे 20 रूपयांना कापसाचे वस्त्र 10 रूपये, झेंडूची फुले 120 रूपये किलो, शेवंती, गलाटा, गुलाब, निशिगंध, अष्टर मिक्स फुले 200 रूपये किलो, कमळ 30 रूपये, गुलाब गुच्छ 50 रूपये, मोगऱ्याचा गजरा 30 रूपये एक, जाई-जुई व कुंदा फुलांचा गजरा 25 रूपयांना एक, केवड्याचे फुल 20 ते 50 रूपयांना एक, चाफा फुल 10 रूपयांना एक, तुळस पेंडी 20 रूपये असे पुजेच्या साहित्याचे दर आहेत. हे साहित्य खरेदीला ग्राहकांनी पसंदी दिली आहे. तसेच घराघरात तुळशीच्या पुजेची तयारी सुरू आहे. तुळशी वृंदावन परिसरातील स्वच्छता करून कलर केला जातो. लग्न लावण्याच्यावेळी रांगोळी साकारली जाते. पुजाऱ्यांना बोलावून विधीवत तुळशीचे लग्न लावले जाते. लग्नसोहळ्यानंतर प्रसाद वाटप व फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.