चन्नम्मा चौकातील रहदारी मार्गी लावण्यासाठी हालचाली
जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुख, मनपा आयुक्तांकडून पाहणी : चन्नम्मा चौक ‘नो प्रोटेस्ट झोन’ करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार
बेळगाव : शहरातील मुख्य वर्दळीच्या राणी चन्नम्मा चौकात रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये व शिस्त लागावी, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते व महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. गुरुवारी चन्नम्मा चौकात स्वत: जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, मनपा आयुक्त कार्तिक एम., मनपाच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दुपारी भेट देऊन त्या ठिकाणचे अडथळे विशेषकरून आयलँड (शोभेचे त्रिकोण) हटविण्यासंदर्भात चर्चा केली. शहरात दिवसेंदिवस रहदारीची समस्या वाढत चालली आहे.
वाहनांच्या संख्येच्या तुलनेत शहरातील रस्त्यांची रुंदी कमी असल्याने वारंवार ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर नेहमी रहदारी असणाऱ्या चन्नम्मा चौकात वेगवेगळ्या संघटनांकडून मोर्चे, आंदोलने करण्यात येतात. या काळात चन्नम्मा चौकात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते व याचा ताण शहरातील इतर रस्त्यांवर पडतो. मध्यंतरी करण्यात आलेले एक आंदोलन दिवसभर चन्नम्मा चौकात करण्यात आल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. तसेच वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांची दमछाक झाली होती.
आयलँड, लोखंडी अँगल हटविण्याबाबत अधिकाऱ्यांत चर्चा
या सर्व बाबी लक्षात घेत चन्नम्मा चौक ‘नो प्रोटेस्ट झोन’ करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्तावही वाहतूक पोलिसांकडून पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याचे समजते. त्यातच सोमवार दि. 8 डिसेंबरपासून बेळगावात कर्नाटक सरकारचे विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील मार्गांवर सातत्याने मंत्रिमहोदय व अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा धावणार आहे. या सर्व बाबींचा विचार करत वाहतूक कोंडी व पोलिसांवर याचा ताण येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याकडून नियोजन सुरू झाले आहे.
चन्नम्मा चौकात चोहोबाजूला आयलँड आहेत. त्याचबरोबर एका ठिकाणी लोखंडी गॅलरीही आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यंदे खूटकडे, तसेच सिव्हिल हॉस्पिटलकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड व न्यायालय आवाराकडे येणारी वाहने कोणत्याही अडथळ्याविना पुढे यावीत, यासाठी तेथील आयलँड व लोखंडी अँगल हटवावेत का, याबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अहवाल तयार करण्याची सूचना केली. याची जबाबदारी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. सध्या चन्नम्मा चौकातून एकाचवेळी दोन अवजड वाहने जाऊ शकतात. भविष्यात तीन वाहने पार होतील, याबाबत गांभीर्याने विचार केला जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाचीही पाहणी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही ड्रेनेज लाईन घालण्यासह इतर कामे सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आवारातील पेव्हर्स काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठेकेदाराकडून सुशोभिकरणाचे काम सुरू आहे, त्या ठेकेदाराकडून गुरुवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वत: सुरू असलेल्या कामासंदर्भात माहिती जाणून घेत दर्जेदार काम करण्याची सूचना केली.