Satara News : साताऱ्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात पोलिसांचे संचलन
सातारा नगरपालिका निवडणुकीपूर्वी पोलिसांचे रूट मार्च
सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेत पोलिसांनी अतिसंवेदनशील मानल्या परिसरात पोलीस दलाच्या वतीने संचलन करण्यात आले. यात सदर बझार, पिरवाडी, बागवान गल्ली, कसाई गल्ली, लक्ष्मी टेकडी आणि इंदिरानगर परिसरात रूट मार्च काढला.
पालिका हद्दीतील निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाहण्यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा, शाहूपुरी आणि तालुका पोलिसांचे संचलन घेण्यात आले. दरम्यान, एसआरपीएफ पोलिसांच्या तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या असून दंगा नियंत्रण पथक देखील तैनात केले आहे. रूट मार्चमध्ये सातारा
पोलीस दलाची वाहने, पोलीस अधिकारी-कर्मचारी, जलद कृती दल, दंगा नियंत्रण पथक आणि होमगार्ड यांचा सहभाग होता. डोक्यावर हेल्मेट, हातात लाठी, ढाल आणि बंदुकीसह सशस्त्र पोलिसांनी गल्ली-बोळातून संचलन केले. यावेळी नागरिकांनीही पोलिसांचे मनोबल वाढवले. निवडणूक काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस पथके सतर्कतेने लक्ष ठेवणार आहेत.
या रूट मार्चमध्ये एकूण ४५० पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. शहरातील महत्त्वाच्या मार्गावरून संचलन करत पोलिसांनी नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेबाबत आश्वस्त केले. पुढील दिवसांतही ही सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, निवडणूक शांततेत पार पाहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.