For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिजगर्णीत बिबट्यासदृश प्राण्याचा वावर

11:16 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिजगर्णीत बिबट्यासदृश प्राण्याचा वावर
Advertisement

वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याकडे वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांमध्ये भीती

Advertisement

वार्ताहर/किणये

बिजगर्णी भागात बिबट्यासदृश प्राण्याचा वावर वाढला असून गेल्या चार दिवसांपासून या भागात गस्त घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याकडे वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. नेमका हा प्राणी बिबट्या की अन्य कोणता? याची चर्चा मात्र सध्या सुरू आहे. याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान बिजगर्णीतील टॉवरजवळ कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला. यावेळी काहींनी बाहेर येऊन पाहिले असता. बिबट्यासदृश्य प्राणी शिवारातून पळून गेल्याचे निदर्शनास आले. रात्रीची वेळ असल्यामुळे तो वन्यप्राणी व्यवस्थित नजरेस आला नाही. मात्र बिबट्यासदृश प्राणी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Advertisement

बुधवारी सकाळी सदर ठिकाणी पाहणी केली असता टॉवरजवळ व बंडू भाष्कळ यांच्या शिवारात वन्यप्राण्याचे असे आढळून आले. त्यामुळे काही जणांनी वनखात्याच्या शिपायांना याबाबत माहिती दिली. मात्र वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. या परिसरात बिबट्यासदृश प्राणी काही जणांच्या निदर्शनास येऊनही वन  खात्याकडून कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. यामुळे वनखात्याच्या अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त होत असून सदर प्राण्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. बुधवारी सकाळी शालन बंडू भाष्कळ या आपल्या शिवारात गेल्या होत्या. त्यांनाही बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले. त्यामुळे शेतशिवारात जाताना आता शेतकरी जीव मुठीत घेऊनच जात आहेत.

यापूर्वीही बिजगर्णी-बेळवटी भागात बिबट्या आला होता. त्यावेळी बिबट्याने जनावर व बकऱ्यांवर हल्ला केला होता. तसेच गतवर्षी बिजगर्णी-राकसकोप या भागातही हत्तीने धुमाकूळ घातला होता. अखेर त्या हत्तीला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी हुसकावून लावले होते. त्या हत्तीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. पश्चिम भागात भात पीक कापणीला आले आहे. सध्या पावसामुळे  कापणीची कामे लांबणीवर पडली आहेत. मात्र पावसाने उघडीप दिल्यास शेतकरी भात कापणीच्या कामांना सुरुवात करणार आहेत. मात्र, बिबट्यासदृश प्राण्याच्या वावरामुळे भात कापणी करायची कशी, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी

बुधवारी दुपारी शिवाराकडे गेलो असता कुत्र्यांचा कळप पळत आलेला पाहिला. बाजूलाच असलेल्या झुडुपाजवळ बिबट्यासदृश प्राणी पाहिला आणि घाबरून घर गाठले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात पाहणी करावी व सदर प्राण्याचा बंदोबस्त करावा. कदाचित वन खात्याचे अधिकारी येऊन पाहणी करीपर्यंत त्या प्राण्याचे ठसेही गायब होण्याची भीती आहे.

-मनोहर भाष्कळ,बीजगर्णी 

Advertisement
Tags :

.