आपत्तींचे डोंगर
उत्तराखंडमध्ये सातत्याने ढगफुटीनंतर विध्वंस : मोठ्या जीवितहानीला अतिक्रमणही कारणीभूत
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिह्यातील धराली येथे नुकताच ढगफुटीच्या घटनेनंतर आलेल्या मोठ्या पूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला. अशा आपत्ती येथे सातत्याने घडताना दिसतात. तेथील नैसर्गिक रचनाच डोंगर-दऱ्यांची असल्यामुळे प्रचंड पाऊस, भूस्खलन, ढगफुटी अशा वेळोवेळी घडतात. गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. 2013 मधील केदारनाथमध्ये झालेल्या प्रचंड हानीची घटना तर अनेकांच्या स्मरणात आजही आहे. उत्तराखंड हे राज्य तेथील नैसर्गिक पर्यटन आणि भक्तीभावाशी जोडलेले आहे. ‘देवभूमी’ अशी या राज्याची ओळख आहे. त्यामुळे बाराही महिने पर्यटक व भाविकांचा ओघ असतो. अशा परिस्थितीत एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती घडली तर त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटतात. याच पार्श्वभूमीवर तेथील सद्यस्थितीवर टाकलेली नजर...!
धरालीमधील ढगफुटीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 50 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. या आपत्तीनंतर भारतीय लष्कर, हवाई दल आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीआरओ आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या संयुक्त बचाव व मदत पथकांनी आतापर्यंत बऱ्याच लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मदत आणि बचावकार्य जोरात सुरू आहे. या कारवाईत लष्कर आणि अभियांत्रिकी तुकड्यांसह 225 हून अधिक लष्करी कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.
ढगफुटीनंतर धराली परिसरावर बराच परिणाम झाला आहे. डोंगरावरून आलेल्या पाणी आणि चिखलाच्या लोंढ्यामुळे अनेक भागात माती-दगड-वाळू यांचा खच निर्माण झाला आहे. या आपत्तीमुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. आतापर्यंत लष्कराने सुमारे 200 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. जखमींनाही तेथून बाहेर काढून उत्तरकाशीला आणले जात आहे. लष्करी अभियंत्यांची एक टीमही धराली येथे पोहोचली असून ती ढिगारा हटवण्याचे आणि हालचाल पूर्ववत करण्याचे काम करत आहे.
धरालीमधील ढगफुटी आणि भूस्खलन प्रभावित क्षेत्रात घरे आणि इतर इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर, भारतीय सेना, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर एजन्सी सतत शोध आणि बचावकार्यात गुंतल्या आहेत. प्रशासन सध्या लोकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतानाच सर्व बाजूंनी घटनेची तपासणी करत आहे. आता सरकारचे उद्दिष्ट धराली गावाचे पुनर्वसन करणे आणि ते सामान्य स्थितीत आणणे हे आहे. उत्तराखंडमध्ये अशा घटना विशेषत: पावसाळ्यात घडताना दिसतात.
भारतात दरवर्षी पावसाळ्यात ढगफुटीच्या घटना घडतात. विशेषत: डोंगराळ भागात घडलेल्या अशा घटनांमुळे भयानक विध्वंस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होते. या दुर्घटनेनंतर राज्यातील जवळजवळ सर्व जिह्यांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे. मान्सूनच्या प्रभावामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत आणि बचावकार्य राबवले जात आहे. या परिस्थितीवर एक अहवाल तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री धामी यांनी ठोकला तळ
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बाधित भागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या आपत्तीतून सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संकटाच्या वेळी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारचे अधिकारी मदत व बचावकार्यात सतत गुंतलेले आहेत. ‘जोपर्यंत सर्व बचाव आणि मदतकार्य पूर्णपणे सुरळीत होत नाही तोपर्यंत मी येथेच राहीन आणि प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवीन’, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी धरालीमध्येच ठाण मांडले आहे.
घटनेनंतर अनेक रस्ते बंद
उत्तरकाशीमधील ढगफुटीनंतर भटवारीहून धरालीकडे जाणारे अनेक रस्ते तुटलेले आणि उद्ध्वस्त झाले आहेत. पिपलकोटीजवळील टेकडीवरून ढिगारा पडल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्याच वेळी, गंगोत्री महामार्ग आधीच बंद आहे. रुद्रप्रयागमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथच्या पायथ्याशी दगड पडण्याची आणि रस्त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून केदारनाथ यात्राही वेळोवेळी तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलली जात आहे.
हवामान खात्याचा इशारा
देहराडून येथील हवामान केंद्राने उत्तराखंडच्या सर्व जिह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अनेक जिह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पौडी गढवाल, टिहरी, उत्तरकाशी, देहराडून, चंपावत, उधम सिंह नगर, बागेश्वर आणि नैनीतालसाठी 12 ऑगस्टपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
एनडीआरएफ पथक सक्रीय
उत्तरकाशीमध्ये सुरू असलेल्या मदत व बचावकार्यात एनडीआरएफची चार पथके सध्या मदतकार्यात व्यग्र आहेत. सुरुवातीला सर्व रस्ते बंद आणि खराब झाल्यामुळे त्यांना धराली येथे पोहोचण्यास विलंब झाला. विमान-हेलिकॉप्टरने काही कर्मचाऱ्यांना तिथे पोहोचवण्यात आले. आता बहुतांश सर्व एनडीआरएफ कर्मचारी दाखल झाले असून ते आता प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी झाले आहेत, असे एनडीआरएफचे डीआयजी गंभीर सिंह चौहान यांनी सांगितले.
रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) उत्तराखंडमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या भूस्खलन आणि मोठ्या प्रमाणात ढगफुटीच्या घटनांमुळे बाधित झालेल्या भागात मदत आणि दुरुस्तीचे काम वेगाने सुरू केले आहे. बीआरओ पथके उत्तरकाशी-धारसू-गंगोत्री आणि जोशीमठ-मलारी या दोन प्रमुख मार्गांवर सतत काम करत आहेत. जोशीमठ-मलारी रस्त्यावर प्रकल्प शिवालिक पथके जड यंत्रसामग्रीसह तैनात आहेत. खराब हवामान आणि कठीण परिस्थितीशी झुंजत करत रस्ते संपर्क पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एका जेसीओसह 8 सैनिक बेपत्ता
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार धरालीतील ढगफुटीच्या घटनेत 1 ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) आणि 8 सैनिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत 9 लष्करी कर्मचारी आणि 3 नागरिकांना हेलिकॉप्टरने देहराडूनला पाठवण्यात आले आहे. 3 गंभीर जखमींना रुग्णवाहिकेने ऋषिकेश येथे एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. तर 8 इतर जखमी नागरिकांवर उत्तरकाशी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदत कार्यादरम्यान, लष्कराने 2 मृतदेहही बाहेर काढले आहेत. मदत पथके घटनास्थळी सतत प्रयत्न करत आहेत.
ढगफुटीच्या मोठ्या घटना
- उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन मोठी हानी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ढगफुटीमुळे गंभीर आपत्ती आल्या आहेत. अलिकडेच 9 जुलै 2025 रोजी उत्तराखंडच्या चमोली जिह्यात ढग फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले. या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. एका नाल्याचे नदीत रूपांतर झाल्यामुळे संपूर्ण गावात हाहाकार माजला होता.
- 31 जुलै 2024 रोजी तिहरीच्या जखानियाली येथे ढगफुटीची घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीतही अनेक घरांची पडझड होण्याबरोबरच शेती-भातीमध्ये माती-दगड आणि चिखल पसरल्याने मोठी हानी झाली होती.
- 19-20 जुलै 2024 रोजी पिथोरागडमध्ये अनेक ठिकाणी ढग फुटल्याने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे तेथे 11 जणांचा मृत्यू झाला, तर त्या आपत्तीत अनेक लोक बेपत्ता झाले होते. अनेक घरेही जमीनदोस्त झाली होती. विनाशकारी पुरामुळे अनेक गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
- केदारनाथमध्ये 16-17 जून 2013 रोजी घडलेली आपत्ती कोणीही विसरू शकत नाही. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. या दुर्घटनेत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. केदारनाथची ही दुर्घटना देखील ढगफुटीमुळेच घडली. या भयानक पुरात हजारो लोक वाहून गेले आणि त्यांचे मृतदेह अद्यापही सापडलेले नाहीत.
- सप्टेंबर 2012 मध्ये उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनेत 45 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत सुमारे 40 लोक बेपत्ता झाले होते, त्यापैकी फक्त 22 मृतदेह सापडले होते. या दुर्घटनेत रस्त्यांचीही अपरिमित हानी झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.
6 . ऑगस्ट 1998 मध्ये कुमाऊंमधील काली घाटी येथे ढगफुटी झाली. या घटनेत सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाला. या काळात कैलास मानसरोवरला गेलेल्या सुमारे 60 लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही घटनाही उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक मोठी आपत्ती म्हणून गणली जाते.
भरपाई देण्याची प्रक्रिया...
ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यू किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास केंद्र आणि राज्य सरकार बाधित कुटुंबांना भरपाई देतात. ही भरपाई भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती मदत निधी (एनडीआरएफ) आणि राज्य सरकारांच्या राज्य आपत्ती मदत निधी (एसडीआरएफ) अंतर्गत दिली जाते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनासाठी एक चौकट तयार करण्यात आली असून त्यामध्ये भरपाईची तरतूद समाविष्ट आहे. त्यानुसार ढगफुटी, पूर किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत सरकार पीडितांना आर्थिक मदतीसह इतर मदतही प्रदान करते. सध्या, केंद्र सरकारच्या धोरणानुसार मृतांच्या कुटुंबाला प्रत्येक मृत्यूमागे 2 लाख रुपये भरपाई दिली जाते. याशिवाय, राज्य सरकार वेगळी मदत पुरविते. याशिवाय, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारला करावा लागतो. घर, पीक किंवा पशुधनाचे नुकसान झाल्यास मालमत्तेच्या नुकसानावर वेगवेगळ्या रकमेची तरतूद आहे.
- जयनारायण गवस