पर्वता, तुझा रंग कसा ?
पाण्या तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा’ अशी म्हण आहे. कारण शुद्ध पाण्याला स्वत:चा रंग नसतो. त्यामुळे त्यात जो रंग मिसळला जाईल, तो त्याचा रंग असतो. पण इटलीत ‘डोलोमाईटस्’ नामक एक पर्वतरांग आहे. हे पर्वत रंगपरिवर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. दिवसभरात अनेकदा ते भिन्न भिन्न रंग धारण करतात. सूर्यप्रकाशाच्या प्रखरतेवर त्यांचा रंग अवलंबून असतो. त्यामुळे पाण्याप्रमाणे या पर्वतालाहा। ‘पर्वता, तुझा रंग कसा’ असा प्रश्न विचारला जातो.
याला डोलोमाईट आल्प्स असेही म्हणतात. जगातील सर्वात आकर्षक पर्वत म्हणून याची ख्याती आहे. या पर्वतांवरुन आपल्याला वर निळेभोर आकाश, खाली खडकांनी बनलेल्या पर्वतांची शिखरे आणि दऱ्या, या दऱ्यांमध्ये पिवळ्या जर्द रंगांचे सहस्रावधी वृक्ष आणि निखळ पाण्याचे झरे दिसतात. असे मनोहारी दृष्य अन्य कोणत्याही पर्वतावरुन दिसत नाही, असे पर्यटकांचे म्हणणे आहे.
या पर्वतरांगांना युनेस्कोने जागतिक वारसा केंद्राचा दर्जा दिला आहे. या पर्वरांगांमध्ये 18 शिखरे असून हे पर्वत कॅलशियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट या रासायनिक पदार्थांच्या मोठ्या खडकांपासून बनलेले आहेत. हे खडक चमकदार आहेत. त्यांना स्वत:चा रंग असला, तरी ते सूर्यप्रकाशाच्या प्रखरतेनुसार आपल्या रंगात परिवर्तन करताना दिसतात. त्यामुळे दिवसाच्या प्रत्येक वेळी त्यांचा रंग भिन्न भिन्न असतो. संध्याकाळी सूर्य मावळायच्या वेळेला हे रंग अधिक नयनमनोहर दिसतात. गुलाबी छटा असणारे हे खडक पर्यटकांच्या विशेष आवडीचे असल्याने तेथे हिंवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या प्रारंभी प्रचंड गर्दी असते.