गुगल इंडिया-एनपीसीआय यांच्यात सामंजस्य करार
भारतीयांना जगभरात युपीआय वापरता येणार : विदेशी व्यापाऱ्यांसाठी खुली होणार दारे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता भारतीय पर्यटकांना लवकरच गुगल पेच्या मदतीने जगभरात युपीआयच्या द्वारे व्यवहार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याकरीता गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिस आणि एनपीसीआय आंतरराष्ट्रीय पेमेंट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून यावर स्वाक्षरीही करण्यात आली आहे.
हा सामंजस्य करार युपीआयची जागतिक स्तरावरची उपस्थिती अधिक मजबूत करणारी ठरणार आहे. विदेशी व्यापाऱ्यांना भारतीय ग्राहकांपर्यंत प्रवेश मिळणार असून ज्यांना सध्या डिजिटल पेमेंटसाठी केवळ विदेशी चलन, व्रेडिट आणि परदेशी चलन कार्डांवर अवलंबून राहावे लागत आहे. एका निवेदनानुसार गुगल पेने म्हटले आहे, की सामंजस्य कराराची तीन मुख्य उद्दिष्टे राहणार आहेत.
करारामधील मुख्य बाबी......
? भारताबाहेरील प्रवाशांना युपीआय पेमेंटचा वापर वाढवायचा आहे, जेणेकरुन ते विदेशात सहज व्यवहार करु शकतील
? सदरच्या कराराचे उद्दिष्ट इतर देशांना युपीआय सारख्या पेमेंट प्रणाली स्थापन करण्यास मदत करणे हे असून अखंड आर्थिक व्यवहारांसाठी एक मॉडेल प्रदान करणार आहे.
? युपीआय पायाभूत सुविधा वापरणाऱ्या देशांमधील रेमिटन्सची प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष केंद्रीत करणे, त्यामुळे सीमापार आर्थिक व्यवहार करणे सोपे होणार आहे.
डिजिटल पेमेंट प्रणाली चालवण्याचे ज्ञान मिळेल
एनआयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रितेश शुक्ला म्हणाले, ‘ही धोरणात्मक भागीदारी केवळ भारतीय पर्यटकांसाठी विदेशातील व्यवहार सुलभ करणार नाही, तर आम्हाला इतर देशांमध्ये यशस्वी डिजिटल पेमेंट प्रणाली ऑपरेट करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्यदेखील देईल.
ते म्हणाले, ‘या सामंजस्य करारामुळे यूपीआयची जागतिक उपस्थिती मजबूत होईल. विदेशी व्यापाऱ्यांना भारतीय ग्राहकांपर्यंत प्रवेश मिळेल ज्यांना सध्या डिजिटल पेमेंटसाठी केवळ विदेशी चलन, क्रेडिट आणि विदेशी चलन कार्डांवर अवलंबून राहावे लागत आहे.
युपीआय व्यवहाराचा डिसेंबर 2023 मध्ये नवा विक्रम
युपीआयने डिसेंबर 2023 मध्ये 1,202 कोटी व्यवहारांचा नवा विक्रम रचला होता. या काळात लोकांनी 18,22,949.45 कोटी रुपयांचे व्यवहार केले होते. तर एक महिन्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये 1,123 कोटी व्यवहारांद्वारे 17,39,740.61 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.