मोटोरोला भारतात दुप्पट स्मार्टफोन्स निर्यात करणार?
2022 मध्ये 10 लाखाहून अधिक फोन्सची निर्यात: 50 ते 60 टक्के फोन्स विक्रीची आशा
वृत्तसंस्था/ चेन्नई
स्मार्टफोन क्षेत्रातील कंपनी मोटोरोला पुढील वर्षी भारतामध्ये स्मार्टफोनची निर्यात दुप्पट करण्याची योजना बनवत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भातली माहिती दिली आहे.
चीनमधील लेनोवो या कंपनीच्या मालकीअंतर्गत काम करणाऱ्या मोटोरोलाला आगामी काळात भारतामध्ये स्मार्टफोन्सची निर्यात जास्तीत जास्त करायची आहे. भारत सरकार अंतर्गत देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेला प्रोत्साहन देणाऱ्या पीएलआय योजनेअंतर्गतचा लाभ उठवणारी मोटोरोला ही लाभार्थी कंपनी मानली जाते.
काय म्हणाले कार्यकारी संचालक
मोटोरोलाचे आशिया-प्रशांत विभागाचे कार्यकारी संचालक प्रशांत मणी यांनी सांगितले, की चीनमधून स्मार्टफोन्सचा पुरवठा उत्तर अमेरिकेमध्ये केला जाणार असून तेथून तो भारतामध्ये निर्यात केला जाणार आहे. सध्याला चीन उत्तर अमेरिकेला 20 ते 25 टक्के इतक्या स्मार्टफोन्सची निर्यात करतो. दरवर्षी आम्ही विकासाच्या दिशेने प्रगती करत असून पुढील वर्षी फोन्सची निर्यात दुप्पट करण्याची योजना कंपनी बनवते आहे.
2022 मध्ये किती केली निर्यात
बाजारातील तज्ञांच्या माहितीनुसार मोटोरोलाने वर्ष 2022 मध्ये भारतात 10 लाखाहून अधिक स्मार्टफोन्सची निर्यात केली आहे. सदरचे स्मार्टफोन्स हे देशातीलच इलेक्ट्रॉनिक्स निर्माती कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजी यांच्यामार्फत तयार करण्यात आले आहेत.
या कॅलेंडर वर्षामध्ये ऑक्टोबरपर्यंत 8 लाखपेक्षा अधिक स्मार्टफोन्सची निर्यात करण्यात आली आहे. भारतीय बाजारामध्ये विक्रीच्या तुलनेमध्ये निर्यातीला चालना देण्यासाठी जोर दिला जाणार असल्याचेही मणी यांनी सांगितले. देशांतर्गत बाजारामध्ये विक्रीमध्ये 50 ते 60 टक्के वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.