For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रायलच्या नावाखाली पळविली मोटारसायकल

11:04 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रायलच्या नावाखाली पळविली मोटारसायकल
Advertisement

चोरीची दुचाकी देऊन गंडविल्याचा प्रकार : माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल

Advertisement

बेळगाव : ‘मला तुमच्यासारखीच मोटारसायकल खरेदी करायची आहे. थोडा वेळ ट्रायल बघून येतो’, असे सांगत एका भामट्याने नर्सिंग विद्यार्थ्याची यामाहा मोटारसायकल पळविल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. चोरीची सुझुकी एक्सेस त्या विद्यार्थ्याच्या हातात देऊन त्याने खरेदी केलेली मोटारसायकल भामट्याने पळविली आहे. 30 जानेवारी 2024 रोजी दुपारी शिवबसवनगर येथे ही घटना घडली असून यासंबंधी शुक्रवारी येथील माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. यामाहा मोटारसायकल पळविण्यापूर्वी भामट्याने दिलेली सुझुकी एक्सेस चोरीची असल्याचे उघडकीस आले आहे. करडीगुद्दी येथील शिवकुमार मल्लिकार्जुन मुकण्णावर, सध्या रा. श्रीनगर हे होनगा येथील विजया कॉलेज ऑफ नर्सिंग सायन्समध्ये बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेतात. कॉलेजला जाण्यासाठी त्यांनी यामाहा आरएस मोटारसायकल (क्र. केए 22, एचपी 4685) खरेदी केली होती. 30 जानेवारी रोजी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील एका कँटीनमध्ये ते चहा पिण्यासाठी गेले. कँटीनजवळ शिवकुमार यांना गाठलेल्या एका भामट्याने मलाही तुमच्यासारखीच मोटारसायकल खरेदी करायची आहे. थोडा ट्रायल बघून येतो, असे सांगून शिवकुमार यांची यामाहा त्याने आपल्या ताब्यात घेतली. त्याच्या बदल्यात नंबरप्लेट नसलेली सुझुकी एक्सेस शिवकुमार यांच्याकडे दिली. ट्रायलसाठी गेलेला भामटा परतलाच नाही. भामट्याने दिलेली सुझुकी एक्सेस ही खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.