For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mother's Day 2025: मी पाहते, सैन्यात माझा सातू कुठे दिसतो का?, 'त्या' वीरमातेचा कंठ दाटून आला

12:41 PM May 11, 2025 IST | Snehal Patil
mother s day 2025  मी पाहते  सैन्यात माझा सातू कुठे दिसतो का    त्या  वीरमातेचा कंठ दाटून आला
Advertisement

माझा बाळ लढताना वाघासारखा जगून अजरामर झाला.

Advertisement

By : सदाशिव आंबोशे 

कोल्हापूर (सेनापती कापशी) :

Advertisement

माझ्या मुलाचं वय अवघं 24 वर्षे होतं... ज्या वयात मौज-मजा करायची त्याच वयात माझं बाळ सैन्यात भरती झालं आणि देशाच्या कामी आलं... मला माझं बाळ गेल्याचं दु:ख तर आहेच, परंतु तो किड्या-मुंगीसारखं जगण्यापेक्षा वाघासारखं जगून अजरामर झाल्याचा मला जास्त अभिमान आहे. ज्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी माझ्या मुलाचा घात केला, माझ्या सुनेचं कुंकू पुसलं त्यांचा आता सैन्यानं नायनाट करावा, अशा तीव्र भावना वीरमाता आनंदी महादेव पाटील यांनी व्यक्त केल्या.

त्या म्हणाल्या, गेले काही दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये धुमश्चक्री सुरू आहे. भारत त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. मी सतत टीव्हीसमोर बसून सीमेवरची सर्व दृश्ये पाहत आहे. आपल्या सर्व सैनिकांना धैर्याने लढण्याचे बळ परमेश्वराने द्यावे. त्या लढणाऱ्या सैन्यात माझा सातू कुठे दिसतो का? ते मी पाहतेय... हे सांगताना त्या वीरमातेचा कंठ दाठून आला.

डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होत्या. पण आपल्या वीर पुत्राचा अभिमानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ‘11 ऑक्टोबर 2013 रोजी माझा मुलगा जम्मू आणि काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हुतात्मा झाला. माझ्या मुलामुळे आम्हाला सर्व काही मानसन्मान मिळाला आहे. पण माझं बाळ आमच्यात नसल्याचं दु:ख मात्र आजही सलत आहे.’

वीरमाता आनंदी महादेव पाटील, मुलगा साताप्पाबद्दल भरभरून बोलत होत्या. मी त्याला लाडाने नेहमी सातू म्हणूनच हाक मारत असे... शाळेत असतानाच सैन्यात जाण्याची त्याची इच्छा होती. आमचे कुटुंब तसे खूप मोठे आहे. त्यामुळे पै-पाहुण्यांचा गोतावळाही मोठा आहे. परंतु आमच्यातील कोणीही सैन्यात नव्हते. त्यामुळे सातूला नेहमी वाटत होते, आपण सैन्यातच जायचे.

दहावी झाल्यानंतर त्याने सैन्यात जाण्याची तयारी केली. अशातच तो 12वी पास झाला. एकदा मला म्हटला, आई ज्यांना एकटाच मुलगा आहे, ते आई-वडीलही मुलाला सैन्यात पाठवतात. आम्ही तर दोघे भाऊ आहोत. एक देशसेवेसाठी गेला, तर तुम्हाला सांभाळण्यासाठी दुसरा पाठीमागे आहेच की, असे तो म्हणायचा. तो मित्रांमध्येही फारसा रमत नव्हता. म्हणायचा, कुठेतरी वाद झाला तर माझ्यावर केस होईल.

माझे आर्मीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षाला असताना भरती झाल्यानंतर त्याची बॅच तयार होईपर्यंत तो तीन महिने घरीच होता. त्यावेळी तो सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून विचारायचा मला कधी बोलावणार? अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले होते. एवढ्या उत्सुकतेने आणि सातत्याने विचारणारा त्यांच्या दृष्टीने तो पहिलाच जवान होता.

सातूचे लग्न होऊन केवळ 14 महिने झाले होते. मात्र पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले. याचा आम्हाला एका बाजूला सार्थ अभिमान आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मुलीसमान सुनेचे सिंदूर पुसले गेले. याचे दु:खही उरात आहे. त्यामुळे आता या पाकिस्तानला धडा शिकवाच, अशा भावनाही या वीरमातेने व्यक्त केल्या.

आजही आनंदी पाटील यांना वाटते, आपल्या हुतात्मा मुलाचा फोन येईल, कोठून तरी तो येईल आणि आई म्हणून मला हाक मारेल. गेल्या एक तपाहून अधिक काळ त्या त्याच्या वाटेकडे डोळे लावून आहेत. त्यांच्या डोळ्याचे पाणी आटत नाही. साताप्पा ज्या शाळेत शिकले त्या शाळेला हुतात्मा साताप्पा महादेव पाटील माध्यमिक विद्यालय असे नाव देण्यात आले आहे. देशाचे नाव उंचावणाऱ्या या वीराचे नाव गावकऱ्यांनी अजरामर केले आहे.

आई असं मरण आलं पाहिजे....

2013च्या स्वातंत्र्य दिनाला आठ दिवस बाकी असताना पाकिस्तानी भ्याड हल्ल्यात आपले सात जवान हुतात्मा झाले होते. त्यामध्ये कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुकच्या कुंडलिक माने यांचा समावेश होता. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी साताप्पा पाटील गावी सुट्टीवर होते.

अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. जमलेला प्रचंड जनसमुदाय आणि त्यांच्यातील देशभक्ती पाहून साताप्पा यांचाही उर अभिमानाने भरून आला होता. घरी आल्यानंतर साताप्पा आंघोळ करता करता आईला म्हणाले, ‘आई मरण यावं तर असं....’ हुतात्मा माने यांच्या पार्थिवाची वाट संपूर्ण तालुका बघत होता.

हुतात्म्यांच्या वाट्याला किती मान सन्मान मिळतो. हा प्रसंग सांगताना साताप्पा यांच्या मातोश्रींना हुंदका आवरता आला नाही. दुसऱ्याच दिवशी साताप्पाची सुट्टी संपली देश सेवेसाठी रुजू झाले. हुतात्मा होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर साताप्पा मला म्हणाला, आई मी आता मोहिमेवर जात आहे. आठ दिवस फोन करता येणार नाही.... ते माझे त्याच्याशी शेवटचे बोलणे होते...

Advertisement
Tags :

.