Mother's day 2025: पोटचा गोळा देशासाठी अपर्ण करणारी वीरमाता लेकराच्या आठवणीने व्याकूळ
तोच काळजाचा तुकडा तिरंगी झेंड्यात लपेटून आला...
By : संतोष कुंभार
कोल्हापूर (शाहूवाडी) :
भारत मातेच्या रक्षणासाठी, देशाचा तिरंगा अविरतपणे अभिमानाने डौलत राहावा. यासाठी पोटचा गोळा देशाला अर्पण करणाऱ्या, तसेच लेकराच्या आठवणीने व्याकूळ होणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील माता याक्षणी ठाम उभ्या आहेत. कारण युद्धाच्या परिस्थितीत त्यांची मुले सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. तालुक्यातील गोगवे येथील शोभा बाळकू माने आणि शितुर तर्फ मलकापूर येथील लक्ष्मी विठ्ठल गुजर या दोन वीरमातांचा शाहूवाडी तालुक्याला अभिमान वाटतो आहे.
पाच वर्षांपूर्वी गोगवे (ता. शाहूवाडी) येथील श्रावण माने हा सर्चिंग स्कॉडमध्ये आपले कर्तव्य बजावत होता. युद्धजन्य परिस्थितीत शत्रूला नामोहरम करण्यासाठी छातीचा कोट करुन निधड्या छातीने शत्रूला सामोरा जात होता. तर गावाकडे श्रावणची आई माझा वीर जवान शत्रूला यमसदनी धाडून अभिमानाने घरी परतेल. त्याला मी पंचारतीने ओवाळेन.
त्याच्या तोंडून ‘आई मी विजयी झालो’ हे शब्द ऐकून मी तृप्त होईन, अशी स्वप्ने पाहणाऱ्या श्रावणच्या आईच्या नशिबी मात्र दुर्दैव आले. ज्या लेकराच्या हातात विजयाचा तिरंगा झेंडा पाहायचा, तोच काळजाचा तुकडा तिरंगी झेंड्यात लपेटून आलेला पाहून आईने फोडलेला हंबरडा आजही कानात घुमतो आहे. आज जागतिक मातृदिनी माझा श्रावण मला शुभेच्छा देईल का? 'आई' अशी त्याने मारलेली हाक माझ्या कानावर पडेल का? असे भाबडे प्रश्न गोगवे गावातील शोभा बाळकू माने या वीरमातेला पडले आहेत.
आपल्या काळजावर दगड ठेवून डोळ्यातील अश्रू रोखत, ही माता अभिमानाने आणि ठामपणे उभी आहे. आपल्या मुलाने देशाला दिलेल्या बलिदानाचा तिला सार्थ अभिमान वाटतो आहे. ‘सुनील लेकरा कुठे शोधू तुला?’ प्रत्येक आईला वाटते लेकराने माझ्या कुशीत यावे, आणि मी त्याच्या पाठीवरून हात फिरवावा. आपल्या लाडक्या लेकाच्या भेटीसाठी आसुसलेली आणि गेले काही दिवस ’आई’ हा शब्द ऐकण्यासाठी आसुसलेली माऊली आजही लेकराच्या आठवणीने कासावीस होते आहे.
लक्ष्मी विठ्ठव्ल गुजर, असे या वीरमातेचे नाव. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा सुनील गुजर देशासाठी हुतात्मा झाला. सुट्टीवर गावी येण्यासाठी तयार असलेला आपला वीर जवान कायमचाच आपल्यातून निघून गेला, हे आठवून आजही या माऊलीला गलबलून येते. मात्र आपल्या मुलाने देशासाठी शौर्य गाजविले, आपले प्राण अर्पण केले याचा अभिमानही त्यांच्या बोलण्यातून सदा जाणवत असतो.
आईच्या मायेची शाल अंगावर घेऊन देशाची सेवा बजावणाऱ्या अनेक जवानांना तळहातावर शीर घेऊन लढावं लागतं. अनेकांना वीरमरण पत्करावं लागतं. यातील अनेकांच्या माऊली आजही आपल्या लेकराची वाट पाहत आहेत. श्रावण माने आणि सुनील गुजर या दोन लेकरांच्या आईही त्यापैकीच आहेत. मात्र डोळ्यातील आसवांना मागे सारत सीमेवरच्या जवानांच्या पराक्रमातच या वीरमाता आपल्या मुलाचा पराक्रम अनुभवत आहेत.