माता, बालकांना मिळतेय सुदृढ आरोग्याचे कवच
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या बालकांचेही आरोग्य सुधारावे, यासाठी केंद्राच्या मातृवंदन योजनेची जिह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. माता व बालमृत्यू दरात घट व्हावी हा योजनेचा हेतू आहे. या योजनेमधून गर्भवती व स्नतदा मातांना सदृढ आरोग्याचे कवच मिळाले आहे. यामध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. एप्रिल ते डिसेंबर 24 अखेर 18 हजार 437 मातांना याचा लाभ मिळाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे 99 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.
दारिद्र्यारेषेखालील व वरील अनेक गर्भवतींना शेवटच्या टप्प्यात मजुरीसाठी काम करावे लागते. त्यामुळे अशा गर्भवती आणि माता कुपोषित राहून त्यांच्यासह नवजात बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूत वाढ झाली. ही बाब गांभिर्याने घेऊन केंद्राने मातृवंदना योजना सुरु केली. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही आरोग्य सुधारावे यासाठी ही योजना कार्यान्वित केली. 1 सप्टेबर 2017 पासून ही योजना सुरु असून 1 जानेवारी 2018 पासून तिची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु आहे.
- दोन टप्प्यात मिळते पाच हजारांचे अनुदान
योजनेत मातेला 5 हजार रूपयांचे सहाय्य दोन टप्प्यात दिले जाते. पहिल्या टप्यामध्ये 3 हजारांचे अनुदान दिले जाते. यासाठी संबंधित गर्भवतेने शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून पाच महिन्यात मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेमध्ये नोंदणी किंवा किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करून घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 हजारांचे अनुदान दिले जाते. यासाठी बालकाच्या जन्मनोंदीचे प्रमाणपत्र तसेच बालकास बीजीसी, ओपीव्ही, डीटीपी, आयपीव्ही आणि हिपॅटायटिस बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण करणे आवश्यक आहे.
- लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
लाभार्थीचे व तिच्या पतीचे आधारकार्ड
लाभार्थीचे आधारकार्ड संलग्न खाते
गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 5 महिन्यांत आत नोंद आवश्यक.
किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी
बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण करणे आवश्यक
- दुसरी मुलगी जन्मल्यास 6 हजारांचा लाभ
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये 1 एप्रिल 22 पासून सुधारणा केली आहे. यामध्ये 1 एप्रिल 22 किंवा त्यानंतर दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6 हजारांचा लाभ बाळाच्या जन्मानंतर एका टप्प्यात दिला जाणार आहे.
- जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा
या योजनेचा लाभ शासकीय नोकरदार महिला वगळता अन्य सर्व गर्भवती आणि स्तनदा मातांना घेता येतो. शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांनी याचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये संपर्क साधावा. ज्यांने गरोदरपणात लाभ घेतला नाही, त्यांना मूल जन्मल्यानंतर दोन वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो.
डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.कोल्हापूर