यंदा ग्रंथ महोत्सव 'अॅनेक्स' परिसरात
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथ महोत्सव या वर्षापासून मुख्य प्रशासकीय इमारत आणि विस्तार (अनेक्स) इमारत यांमधील मोकळ्या प्रांगणात 16 व 17 जानेवारी होणार आहे. ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन गुरूवारी सकाळी 10 वाजता होणार आहे, अशी माहिती बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक तथा ग्रंथ महोत्सव समन्वयक डॉ. धनंजय सुतार यांनी दिली आहे.
दरवर्षी दीक्षान्त ग्रंथ महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहासमोरील आंबा बागेमध्ये भरविण्यात येत होता. गर्दीमुळे बागेमधील झाडांना इजा पोहोचू नये, यासाठी यावर्षीपासून विस्तार (अनेक्स) इमारतीच्या प्रांगणात भरविण्याचा निर्णय घेतआला आहे. महोत्सवात नामवंत भारतीय तसेच विदेशी कंपन्यांचे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजीटल ग्रंथ वितरक सहभागी होणार आहे. तात्पुरती उपाहारगृहेही तेथे असतील. महोत्सवात साधारण 40 स्टॉल असतील. ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने 16 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता कमला महाविद्यालयापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ होईल. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या ग्रंथपालखीच्या पूजनाने दिंडीचे उद्घाटन होईल. कमला महाविद्यालयापासून राजारामपुरीमार्गे आईचा पुतळा, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठाचे गेट क्र. 8 आणि तेथून राजमाता जिजाऊ साहेब सभागृहातील दीक्षान्त सभा मंडपामध्ये आगमन आणि विसर्जन असा दिंडीचा मार्ग असेल. गुरूवारी 11 वाजता संगीत व नाट्याशास्त्र अधिविभाग आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तुकोबांची अभंगवाणी‘ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी राहावे, असे आवाहन डॉ. सुतार यांनी केले आहे.