जन्मदात्रीने अर्भकाचा घोटला गळा
चौथ्यांदाही मुलगी झाल्याने कृत्य : रामदुर्ग तालुक्यातील घटना
बेळगाव : तीन मुलींपाठोपाठ चौथीही मुलगीच झाल्याने नैराशेच्या भरात मातेने दोन दिवसांच्या स्त्रीजातीच्या अर्भकाचा गळा व नाक दाबून खून केल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि. 24 रोजी सकाळी मुदकवी ता. रामदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अश्विनी हणमंत हळकट्टी (वय 30) रा. मालगी ता. बदामी सध्या रा. हिरेमुलंगी ता. रामदुर्ग या महिलेविरोधात सुरेबान पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अश्विनी हिचे माहेर हिरेमुलंगी ता. रामदुर्ग असून तिचा दहा वर्षांपूर्वी मालगी ता. बदामी येथील हणमंत हळकट्टी याच्याशी विवाह करून दिला आहे. अश्विनीला यापूर्वी तीन मुली झाल्या असून चौथ्यावेळी गर्भवती राहिल्याने ती प्रसूतीसाठी माहेरी आली होती. रविवारी प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला माहेरच्यांनी मुगकवी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
त्याचदिवशी सायंकाळी 7 च्या दरम्यान तिची नैसर्गिक प्रसूती झाली व तिने स्त्राrजातीच्या अर्भकाला जन्म दिला. तिच्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्रात आई रेणुका पडीयप्पा मुलीमनी (वय 55) यादेखील होत्या. अश्विनीच्या दुसऱ्या मुलीला शौचास झाल्याने आजी रेणुका तिला बाहेर घेऊन गेली. चौथ्यावेळीदेखील मुलगीच झाल्याने अश्विनी हिने पोटच्या दोन दिवसांच्या स्त्राrजातीच्या अर्भकाचा गळा व नाक दाबून खून केला. सोमवार दि. 24 रोजी सकाळी 7.30 वाजले तरीही नात उठली नसल्याने आजीने तिच्याकडे जाऊन पाहणी केली असता श्वाच्छोश्वास थांबल्याचे दिसून आले. त्यामुळे ही माहिती तेथील परिचारिकेला देण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांना बोलावून घेण्यात आले. दोन दिवसांच्या अर्भकाच्या गळ्यावर आणि नाकावर व्रण आढळून आले. याबाबत माता अश्विनी हिच्याकडे चौकशी केली असता तिने चौथ्यावेळीही मुलगीच झाल्याने नैराशेच्या भरात आपण पोटच्या मुलीचा गळा व नाक दाबून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणात सुरेबान पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.