कोने-प्रियोळ अपघातात माता ठार
फोंडा-पणजी महामार्गावर सायंकाळी 7.30 वा.अपघात
फोंडा : फोंडा-पणजी महामार्गावर कोने-प्रियोळ येथे मालवाहू ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने स्कूटरच्या पाठिमागे बसलेली महिला ट्रकच्या पाठीमागील चाकात चिरडून जागीच ठार झाली. अनुराधा दत्तात्रय पाध्ये (62, कुर्टी-फोंडा) असे तिचे नाव आहे. स्कूटरचालक योगेश पाध्ये हा जखमी असून त्याला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना काल गुऊवारी सायंकाळी 7.30 वा. सुमारास घडली.
म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश पाध्ये आपल्या व्हीगो स्कूटर जीए 05 ई 9501 दुचाकीने आपल्या आईला पाठीमागे बसवून वेलिंगहून फेंड्याच्या दिशेने येत होता. त्याच दिशेने त्याच्यामागाहून येणाऱ्या ट्रक जीए 11 टी 0255 ने स्कूटरला धडक दिली. त्यामुळे पाठिमागे बसली आई रस्त्यावर कोसळून ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडली. चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला. फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले तर दुचाकीचालकावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर फोंडा ते पणजी महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी म्हार्दोळ पोलिसस्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत घटनास्थळी हजर झाले. पुत्र व आई हे दोघेही वेलिंग येथील एका नातेवाईकांकडे गेली होती. वेलिंगहून कुर्टी येथे आपल्या घरी परतीच्या वाटेवर असताना व्रुर काळाने तिच्यावर झडप घातली. मुलाच्या डोळ्यादेखत आईने प्राण सोडले. मयत अनुराधा या कुर्टी येथील गोवा डेअरीजवळील मारूती मंदिरातील पुजारी म्हणून कार्यरत असलेल्या पाध्ये यांच्या मातोश्री होत. याप्रकरणी उपनिरीक्षक झाकी हुसेन यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान आयशर ट्रकचालक भगवंत भेसले (38, खांडेपार) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलमाखाली बेदरकारपणे वाहन हाकून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून म्हार्दोळ पोलिस अधिक तपास करीत आहे.