नाला ओलांडताना मायलेक गेल्या वाहून
उंबरापाणी येथील दुर्घटना : दांडेली पोलिसात गुन्हा दाखल
वार्ताहर/नंदगड
मंगळवारी दमदार पावसामुळे नाल्याला पूर आला. नाला ओलांडताना मायलेक वाहून गेल्याची घटना उंबरापाणी गावापासून काही अंतरावर असलेल्या दांडेली पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. शोधाशोध केल्यानंतर ग्रामस्थांना काही अंतरावर महिला व मुलीचा मृतदेह दृष्टीस पडला. या घटनेत सखुबाई विठ्ठल येडगे (वय 45) व त्यांची मुलगी गंगुताई (वय 17) या मृत्युमुखी पडल्या आहेत. खानापूर तालुक्याच्या हद्दीत तावरकट्टी-दांडेली रस्त्यादरम्यान घनदाट जंगलात उंबरापाणी गाव आहे. गावात गवळी समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे गुरे चारावयास घेऊन सखुबाई व त्यांची मुलगी गंगुताई मंगळवारी सकाळी गावच्या नाल्यापलीकडील जंगलात गेल्या होत्या. दुपारी एक वाजल्यापासून खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सायंकाळी नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले.
सायंकाळी आपली गुरे घेऊन दोघीही उंबरापाणी गावाकडे येत होत्या. दरम्यान जंगलातील पावसाचे पाणी नाल्याला आले. या नाल्याच्या पाण्यातून जनावरे घराकडे आली. परंतु मायलेकी नाला ओलांडताना पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्या. रात्री उशिरापर्यंत दोघीही घरी आल्या नाहीत. ग्रामस्थांनी रात्री शोधाशोध केली. त्यावेळी त्यांच्या चपला एकीकडे तर रेनकोट दुसरीकडे पडल्याचे दिसले. रात्री अंधार असल्याने दोघींचे नेमके काय झाले, याचा अंदाज आला नाही. बुधवारी पहाटे ग्रामस्थांनी जंगल परिसर व नाल्यात शोधाशोध केली. त्यावेळी परतीच्या वाटेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर नाल्यात आई सखुबाई यांचा तर तब्बल 1 किलोमीटर दूरवर मुलगी गंगुताई हिचा मृतदेह दिसून आला. उंबरापाणी गाव खानापूर तालुक्याच्या हद्दीत येत असले तरी पाण्यातून वाहून गेलेली घटना ही दांडेली पोलिसांच्या हद्दीत येते. सदर नाल्याचे पाणी काळी नदीला जाऊन मिळते. घटनेची माहिती दांडेली पोलिसांना दिली. सखुबाई यांच्या पश्चात पती, दोन मुलगे व तीन मुली असा परिवार आहे.