बहुतेक विद्यार्थ्यांची करिअर निवड चूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नव्वद टक्के भारतीय विद्यार्थी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि विचार न करता आपल्या करीअरची निवड करतात, असे एका सर्वेक्षणात आढळले आहे. या सवयीमुळे अशा विद्यार्थ्यांची तर हानी होतेच, तसेच देशासाठीही हे हानीकारक आहे, असे तज्ञांचे मत आहे. भारताच्या प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमध्ये केवळ 1 विद्यार्थी व्यावसायिक सल्ला घेऊन आपल्या करीअरची निवड जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक करतो, असेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
बहुतेक भारतीय विद्यार्थी करीअरची निवड करताना आपले मोठे भाऊ, आईवडील, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा अन्य अव्यावसायिक लोकांचा सल्ला घेतात. कित्येक विद्यार्थी सध्याचा कल कसा आहे, हे बघून करीअरची निवड करतात. पण तज्ञांच्या मते या पद्धती अत्यंत अशास्त्रीय आहेत. विद्यार्थ्यांनी करीअर करताना आपला स्वत:च कल, स्वत:ची क्षमता आणि स्वत:ची आवड निवड लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांचे अनुकरण करुन, ज्यांना व्यावसायिक ज्ञान नाही अशा कुटुंबियांच्या सूचनेवरुन किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून करिअरची निवड करी नये, असे अनेक तज्ञांनी निक्षून स्पष्ट केले आहे.