सर्वाधिक किरणोत्सर्गी शहर
पृथ्वीवरील कब्रस्तान असे पडले नाव, बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी
रशियाच्या युरालमध्ये ओजर्सक शहर असून याला सिटी 40 या नावाने देखील ओळखले जाते. याला जगातील सर्वाधिक किरणोत्सर्गी शहर मानले जाते, या शहराचा उर्वरित जगाशी कुठलाही संपर्क नाही. येथील लोकांना हे शहर सोडण्यासाठी विशेष व्हिसाची गरज भासते आणि विदेशी नागरिकांना या शहरात प्रवेश करण्याची अनुमती नाही. शहराच्या सीमांना काटेरी कुंपणाद्वारे बंद करण्यात आले आहे.
शीतयुद्धादरम्यान अण्वस्त्रसज्ज अमेरिकेशी मुकाबला करण्यासाठी सोव्हियत महासंघाने हे शहर स्थापन केले होते. सोव्हियत महासंघाच्या आण्विक कार्यक्रमाचे हे जन्मस्थान आहे. येथे मयक आण्विक प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यात काम करणारे कर्मचारी आणि नागरिकांसाठी घर उपलब्ध करविण्यासाठी हे शहर डिझाइन करण्यात आले होते. या लोकांना येथे सोव्हियत महासंघाचा अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आणले गेले होते.
आण्विक कार्यक्रमाचा सुगावा जगाला लागू नये याकरता सोव्हियत महासंघाने दशकांपर्यंत या शहराबद्दल गुप्तता बाळगली होती. हे ठिकाण नकाशावरूनही गायब करण्यात आले होते. सोव्हियत जनगणनेसमवेत सर्व नोंदीवरून येथे राहणाऱ्या लोकांची नावे हटविण्यात आली होती.
मयत आण्विक प्रकल्प सर्वात मोठ्या आण्विक आपत्तीला सामोरे गेले होते आणि कथित स्वरुपात ओजर्सकच्या आसपास 200 दशलक्ष क्यूरी रेडिओअॅक्टिव्ह मटेरियल सोडण्यात आले होते आणि मग येथे राहणाऱ्या लोकांना 1957 मध्ये किश्तिम आपत्तीला तोंड द्यावे लागले होते. प्रकल्पात विस्फोट झाल्यावर शहर किरणोत्सर्गी झाले होते, या आपत्तीत नेमके किती लोक मारले गेले होते हे अद्यापही समोर आलेले नाही.
ओजर्सकला पृथ्वीचे कब्रस्तान देखील म्हटले जाते. येथे मृत्यूचे सरोवर असून ते अन्य कुठल्याही ठिकाणापेक्षा अधिक किरणोत्सर्गी आहे. आता या शहराचे सत्य जगासमोर आले असले तरीही हे अद्याप रशियाच्या उर्वरित हिस्स्यांपासून तुटलेले एक अजब स्थान आहे. येथे लोक अद्याप मयक आण्विक प्रकल्पाच्या सावटाखाली जगतात. येथे रशियाच्या रिअॅक्टर्स आणि शस्त्रास्त्रांसाठी सर्व राखीव आण्विक सामग्री जमा आहे.