सर्वात उच्चशिक्षित व्यक्ती
पदव्यांची नावं जाणल्यावर चक्रावून जाल
शिक्षणामुळे लोकांना विवेक अन् ज्ञान प्राप्त होते. माणसाने मिळविलेली पदवी ही त्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे आणि त्याने कुठपर्यंत शिक्षण घेतले आहे हे नमूद करत असते. केवळ रोजगारासाठी पदवी प्राप्त करण्याऐवजी प्रत्यक्षात त्या शिक्षणात पारंगत होणे आवश्यक आहे. निकोलाओस जीनियस हे जगातील सर्वात उच्चशिक्षित व्यक्ती आहेत. ग्रीक वंशाचे ब्रिटिश नागरिक निकोलाओस एक प्रसिद्ध संशोधक आणि शिक्षणतज्ञ आहेत. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय संशोधन आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते काम करतात आणि त्यांच्या नावावर अनेक कामगिरींची नोंद आहे.
निकोलाओस यांच्याकडे 7 विद्यापीठांच्या पदव्या असून त्या डॉक्टरेटसमान आहेत. याचबरोबर ते 7 वैज्ञानिक शिक्षण संघटनांमध्ये कार्यरत आहेत. तसेच त्यांना सायन्स ऑर्गनायझेशनचे सदस्यत्वही मिळाले आहे. निकोलाओस यांच्याकडे हार्वर्ड विद्यापीठ आणि पॅरिस विद्यापीठ यासारख्या अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांच्या पाच मास्टर डिग्री आहेत. 2024 मध्ये आणखी एक डॉक्टरेटची पदवी प्राप्त करण्याची त्यांची योजना आहे. त्यांनी मानसशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्यात पीएचडीसोबत हार्वर्ड मेडिकल स्कूल यासारख्या प्रतिष्ठित संस्थेतूनही पदवी मिळविली आहे.
निकोलाओस यांच्या संशोधनाचा वैज्ञानिक समुदाय आणि जगावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. त्यांना विविध क्षेत्रांचे ज्ञान आहे. निकोलाओस सध्या ज्या विषयांमध्ये संशोधन करत आहेत, त्यामुळे भविष्यात विज्ञानाची नवी क्षेत्रे खुली होणार आहेत. तसेच ते अनेक खासगी संस्थांशी देखील जोडले गेले आहेत. विविध संघटनांमध्ये सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आल्याने चांगले उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. व्यवसायासोबत मानवी शरीर आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर त्यांनी अध्ययन केले आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकांपर्यत प्रत्येक जण त्यांचे संशोधनपत्र वाचण्यासाठी उत्सुक असतो.
निकोलाओस यांच्याकडे डॉक्टर म्हणून काम करण्याचाही अनुभव आहे. त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून इम्युनोलॉजी, फार्माकोलॉजी, जेनेटिक्स, कॅन्सर जीनोमिक्स आणि कोविडचे अध्ययने केले आहे. विविध विषयांवर त्यांनी 50 हून अधिक रिसर्च पेपर लिहिले आहेत. यातील अनेक रिसर्च पेपर्स ही कॅन्सरशी निगडित आहेत. त्यांच्या संशोधनपत्रांना प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले जात असते.