मद्यपींच्या प्रेमात डास
माणसाला सर्वात पिडा देणारा आणि त्रासदायक ठरणारा जीव डास हा आहे. डासांमुळे अनेक विकार होतात. त्यामुळे शक्यतो प्रत्येक माणूस आपल्याला डास चावू नयेत किंवा चावलेच तर कमीत कमी चावावेत, यासाठी प्रयत्नशील असतो. डासांना दूर ठेवण्यासाठी माणसाने अनेक साधनेही शोधलेली आहेत. तरीही डास चावतातच. तथापि, हे डास सर्व माणसांना समान प्रमाणात चावत नाहीत, असे संशोधनात आढळले आहे. ज्यांना मद्य पिण्याचे व्यसन असते, त्यांना डास असे व्यसन नसलेल्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात चावतात. तसेच अंघोळ न केलेल्या, किंवा अस्वच्छ राहणाऱ्या लोकांनाही ते अधिक प्रमाणात चावतात, असे दिसून येते.
या संदर्भात नेदरलँडस् या देशात काही प्रयोग करण्यात आले आहेत. 500 जणांवर केलेल्या या प्रयोगांमधून असा निष्कर्ष निघाला आहे, की जे लोक बियर किंवा मद्य अधिक पितात त्यांना इतरांपेक्षा डास चावण्याचे प्रमाण 35 टक्के अधिक आहे. तसेच रात्री एखादी व्यक्ती कोणासोबत झोपली असेल, याचाच अर्थ समागम केला असेल, तर अशा व्यक्तीलाही डास अधिक प्रमाणात चावतात. ज्यांना आंघोळ करणे फारसे आवडत नाही, किंवा जे कमी वेळा आंघोळ करतात, त्यांच्यावरही डासांचे मोठे प्रेम असते. ते त्यांना अधिक प्रमाणात चावतात.
तथापि, मद्यपान केलेल्या किंवा आंघोळ न केलेल्या व्यक्ती डासांना ओळखता कशा येतात, हा प्रश्न निर्माण होतो. अशा व्यक्तींच्या अंगाला विशिष्ट गंध येत असावा. त्यामुळे डास त्यांच्याकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असावेत, असे मानले जात आहे. या प्रश्नावर अद्याप संशोधन होत आहे. पण मद्यपी लोकांकडे डास अधिक प्रमाणात आकर्षित होतात, हा निश्चित निष्कर्ष हाती आला आहे. हे संशोधन आणि त्याचा निष्कर्ष यातून माणसाला एक संदेश मिळतो. तो असा, की तुम्हाला डास नको असतील, तर तुम्ही मद्यपान आणि आंघोळीची टाळाटाळ करणे, अशा वाईट सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे. अन्यथा, डास अधिक प्रमाणात तुमच्या प्रेमात पडतील आणि तुम्हाला त्यांचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे आता माणसालाच काय करायचे हे ठरवावे लागणार आहे. डासांनी त्यांचा निर्णय दिला आहे, असेही मत हे संशोधन करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केले आहे.