ब्राझीलमध्ये डासांचा ‘कारखाना’
मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन होणे, हे एखाद्या देशाच्या आर्थिक सबलत्वाचे लक्षण आहे. सर्वसाधारणपणे हे उत्पादन वस्तूंचे असते. त्याचप्रमाणे ते गाई, म्हशी इत्यादी मानवोपयोगी प्राण्यांचेही असते. तथापि, या जगाच्या पाठीवर एक देश असा आहे, की जो चक्क डासांचे उत्पादन करतो. ब्राझील हे या देशाचे नाव आहे. या देशात डासांच्या उत्पादनाचे कारखाने आहेत, हे समजल्यावर आपल्याला आश्चर्य निश्चितच वाटेल. कारण डास हे मानवासाठी उपद्रवी असतात. त्यांच्यामुळे मलेरिया, डेंग्यू आदी त्रासदायक रोग निर्माण होतात. डास हे या रोगांच्या जंतूंचे वाहक असतात. त्यामुळे बहुतेक देशांचा कल डास जास्तीत जास्त संख्येने मारण्याकडे असतो. डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होऊ नये, यासाठीही अनेक प्रयत्न प्रशासकीय पातळीवर आणि व्यक्तीगत पातळीवरही केले जातात.
पण ब्राझील देशात मात्र, प्रत्येक आठवड्याला 10 कोटी डास निर्माण करण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे. हा देश इतक्या डासांची निर्मिती का करत आहे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. ब्राझीलमध्ये निर्माण होत असलेले हे डास मानवासाठी अपायकारक नव्हे, तर उपकारक ठरणार आहेत. हे डास डेंग्यू या जगभरात फैलावलेल्या विकारावर नियंत्रित करण्यासाठी, जनुकीय तंत्रज्ञानाचा उपयोग करुन निर्माण करण्यात येत आहेत. या ‘उत्पादित’ डासांचा जेव्हा नेहमीच्या नैसर्गिक आणि् रोगजंतू वाहक डासांशी संयोग होईल तेव्हा नव्या डेंग्यूच्या जंतूंचे वहन न करणाऱ्या डासांची निर्मिती होईल, असे ब्राझीलमधील संशोधकांचे म्हणणे आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास डेंग्यूची लागण मानवाला करणारे डास हळूहळू जगातून नाहीसे होतील आणि मानवाची या तापदायक आणि काहीवेळा जीवघेण्या ठरणाऱ्या आजारापासून मुक्तता होईल, अशी संशोधकांची योजना आहे. डेंग्यू किंवा मलेरिया यांची लागण करणाऱ्या डासांना विषारी रसायनांच्या साहाय्याने कृत्रिमरित्या मारण्यापेक्षा त्यांनाच ‘डेंग्यूमुक्त’ करण्याची ही नवी नैसर्गिक पद्धत अधिक प्रभावी आहे, असेही संशोधकांचे प्रतिपादन आहे. अर्थातच, कोणत्याही जनुकीय प्रयोगांसंबंधी सावधनातेचा इशारा दिला जातो. तसा या प्रयोगालाही दिला गेला आहे. तथापि, आतापर्यंत या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रयोग जगभरात होणे शक्य आहे.