मोरोक्कोकडे युवा विश्व फुटबॉल चषक
वृत्तसंस्था / सॅन्टीयागो
येथे खेळविण्यात आलेल्या फिफाच्या 20 वर्षांखालील वयोगटातील युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोने बलाढ्या अर्जेंटिनाचा अंतिम सामन्यात पराभव करत विजेतेपद पटकाविले. या अंतिम सामन्यात मोरोक्कोने अर्जेंटिनाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. मोरोक्को संघातील झाब्रीनीने 12 व्या आणि 29 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. मात्र अर्जेटिनाला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. 2009 साली घाना या आफ्रिकन देशाने पहिल्यांदा ही फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर या स्पर्धेचे जेतेपद मिळविणारा मोरोक्को हा दुसरा आफ्रिकन देश आहे. या स्पर्धेमध्ये मोरोक्को संघाची कामगिरी सुरूवातीपासूनच दर्जेदार झाली. मोरोक्कोने आपल्या गटात आघाडीचे स्थान मिळविताना स्पेन, ब्राझील आणि मेक्सीकोला मागे टाकले. मोरोक्कोने त्यानंतर बाद फेरीत द.कोरिया, अमेरिका आणि फ्रान्स यांचा पराभव केला. अर्जेटिनाने आतापर्यंत ही स्पर्धा सहावेळा जिंकली होती. पण यावेळी त्यांना मोरोक्कोने संभाव्य सातव्या जेतेपदापासून वंचित केले.