For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिक काम व चांगले काम

06:06 AM Feb 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
अधिक काम व चांगले काम
Advertisement

कामाचे वाढते तास व त्यापोटी येणारा वाढता ताण हे मुद्दे कर्मचाऱ्यांपासून कंपन्यांपर्यंत सर्वांसाठी व नेहमीच जिव्हाळ्याचे ठरतात. वेगवेगळ्या संदर्भासह या चर्चेचा मुख्य भर असतो तो कामाच्या दर्जा आणि उत्पादकतेवर. मात्र बऱ्याचदा हेच दोन महत्त्वाचे मुद्दे तुलनेने दुर्लक्षित राहतात व त्यावरील चर्चा व त्याद्वारे उत्पन्न होणारा ताणतणाव मात्र वाढत जातो.

Advertisement

सर्वसाधारणपणे कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे काम, कामकाज आणि कामाचे तास व त्याचप्रमाणे कामाचा ताण यावरील चर्चेत दोन मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात. यामध्ये बदलती व्यावसायिक स्थिती आणि गरजा यांची पूर्तता करण्यासाठी व्यवसाय- व्यवस्थापनापुढे उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून अधिकाधिक काम करून घ्यावे लागते. यातील दुसरा मुद्दा असतो तो मर्यादित संख्येतील कर्मचाऱ्यांना करावे लागणारे मोठ्या प्रमाणावर व अतिरिक्त काम. यातूनच समस्या निर्माण होते ती कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वाढीव कामाच्या तासांची.

कर्मचाऱ्यांच्या या वारंवार व सातत्याने कराव्या लागणाऱ्या वाढीव काम व कामाच्या तासांचे वाढीव कर्मचारीच नव्हे तर त्यांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबातील सदस्य इ. वर कुठल्या ना कुठल्या स्वरुपात व निश्चितपणे परिणाम होतात. त्यामुळेच या आणि अशा प्रश्नांची चर्चा समाज माध्यमांसह समाजातील विविध  स्तरांवर अपरिहार्यपणे होत असते. मध्यंतरीच्या काळातील एक प्रथितयश कंपनीतील उच्च शिक्षा प्राप्त कर्मचाऱ्याने कामाच्या ताणापोटी केलेली आत्महत्या विशेष व व्यापक सामाजिक चर्चेचा मुद्दा ठरला होता. अशा प्रकारची कर्मचाऱ्यांचे काम, कामाचे वाढीव तास व त्यातून निर्माण होणारा कामाचा ताण यावर वेळोवेळी व विशेष संदर्भात चर्चा होत असली तरी या प्रकरणातील मूळ मुद्दे मात्र बाजुलाच राहतात व त्यावर अपेक्षित स्वरुपाची चर्चा, विचारविमर्ष व कारवाई होत नाही व हाच खरा कळीचा व काळजीचा विषय ठरतो.

Advertisement

या दृष्टीने व विशेषत: विविध मोठ्या व प्रथितयश कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत व विविध स्वरुपातील स्पर्धांवर मात करण्यासाठी प्रसंगी आठवडी 80 ते 90 तास करण्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे कामाचे तास किती आणि का म्हणून असावेत हा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे. त्या दृष्टीने खालील मुद्यांवर त्यामुळेच तातडीने विचार व चर्चा करणे गरजेचे ठरते.

कामाची पद्धती व कार्यसंस्कृती: कंपनी वा संस्थेअंतर्गत कामकाज व काम करण्याची विशिष्ट पद्धती असते. कंपनीचा व्यवसाय, कामकाजाच्या संदर्भातील प्राधान्य, प्रगत स्वरुपाचे काम करण्यावर दिला जाणारा भर, उपलब्ध तंत्रज्ञान, विविध साधने व उपलब्ध कर्मचारी व संसाधने यांचा यात समावेश असतो.

वर नमूद केलेल्या साधन-संसाधनांद्वारेच कंपनीचा व्यवसाय व कामकाज होत असते. या साधन-तंत्रज्ञान, प्रक्रिया, कामकाजाची पद्धती व ते सारे पद्धतशीरपणे व विशिष्ट पद्धतीने व यशस्वीपणे करण्यासाठी जी पद्धती वापरली जाते त्याला संबंधित व्यवसाय-कंपनीची कार्यपद्धती समजली जाते. या कार्यपद्धती म्हणजेच कामकाज पद्धतीमध्ये कर्मचारी, त्यांचे कामकाज, कामाच्या संदर्भातील त्यांचे कामाचे तास व त्यासाठी त्यांना मिळणारी साधने इ. चा प्रामुख्याने समावेश असतो. एकीकडे कंपन्या आणि व्यवस्थापन यांच्या कर्मचाऱ्यांकडून कामाला गती व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी वाढीव व अतिरिक्त तास काम करण्याचे आग्रही प्रयत्न सुरु असतात तर त्याचवेळी वाढते काम व त्यामुळे येणारा वाढता ताण हे दुहेरी आव्हान साधून अपेक्षित स्वरुपात काम करणे ही बाब अनेक कर्मचाऱ्यांसाठी बहुविध स्वरुपात आव्हानपर ठरली आहे.

कामाचे स्वरुप व कामाचे तास: बदलती परिस्थिती व वाढती स्पर्धा यामुळे विशिष्ट पद्धतीने वा विशेष प्रकारचे काम करणाऱ्यांची कामाचे तास व कामाची तयारी या दोन्हीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या जबाबदारीसह करावयाच्या कामामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यवस्थापक, चार्टर्ड अकौंटंट, वकील, डॉक्टर्स, प्रकल्प व्यवस्थापक, बँका वित्तीय संस्थांमधील अथवा गुंतवणूक कंपन्यांमधील उच्च पदस्य व मुख्य म्हणजे मध्यम व लघू उद्योजकांचा समावेश करता येईल.

वर नमूद केलेले उद्योग- व्यवसाय व कामकाज यामध्ये काम करणाऱ्यांच्या कामकाजाचे व विशिष्ट स्थिती वा परिस्थितीमध्ये काम करणाऱ्यांना अमर्याद स्वरुपात व अथकपणे काम करावे लागते. व्यवसायाची वर्ष अखेर, निश्चित कालावधीतील प्रकल्प व्यवस्थापन, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, व्यावसायिक गरजा इ. ची पूर्तता करण्यासाठी प्रसंगी प्रदीर्घ तास वा प्रदीर्घ काळ काम करण्याला पर्याय नसतो. मात्र प्रश्न व समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा अधिकतर  कर्मचाऱ्यांना सरसकटपणे व सातत्याने प्रदीर्घ काळ काम करावे लागते. यातून असे वा अशा प्रकारे वाढीव तासांसह काम करण्याची पद्धती व वृत्ती बनू शकते व असे कायम स्वरुपी झाल्यास कर्मचाऱ्यांच्या उद्विग्न होण्यापासून काहीही होऊ शकते याचा अनुभव नुकताच आपल्या कॉर्पोरेट क्षेत्राने घेतला आहे.

उत्पादन की उत्पादकता: उद्योग-व्यवसायाच्या संदर्भात नेहमीच महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे व्यवसायवाढ. उद्योग-व्यवसायाच्या वाढीसाठी व्यवसाय उद्योग असो वा सेवा, त्यामध्ये कर्मचारी हा महत्त्वाचा व आवश्यक असा घटक असतोच. याच भूमिकेतून कर्मचाऱ्यांकडे पाहण्याची गरज असते. असा विचार जे व्यवस्थापन करते त्यांचा व्यवसाय कायमस्वरुपी फायदेशीर ठरू शकतो.

कामासाठी कर्मचारी की कामाचे कर्मचारी- बऱ्याचदा कंपनीच्या उच्च पातळीवर व वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर कर्मचारी आणि त्यांचे कामकाज याचा योग्य प्रकारे विचार होत नाही. याची पार्श्वभूमी कर्मचाऱ्यांच्या निवडीपासून कंपनीतील वरिष्ठ  व व्यवस्थापनाच्या कर्मचारी आणि त्यांच्या कामाच्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत विविध टप्प्यांमध्ये अनुभवास येते.

याचाच परिणाम म्हणून उपलब्ध कर्मचाऱ्यांपैकी काही व मर्यादित कर्मचारी- अधिकारी यांच्यावर स्वाभाविकच कामाचा अधिक ताण पडतो. कामाचा हा ताण व अती ताण-तणावासह काम करणे ही बाब नेहमीची बनून संबंधित ठिकाणी तीच कामकाज पद्धती म्हणजेच कार्यसंस्कृती बनते. यादृष्टीने व्यवस्थापक व व्यवस्थापन या उभयतांनी कंपनीच्या कामकाजाच्या दृष्टीने सरसकट कर्मचारी नव्हे तर कुशल व उत्पादक काम करणारे कर्मचारी कंपनीचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो ही बाब लक्षात घेणे नितांत गरजेचे ठरते.

तोडगा की तडजोड: त्यामुळेच वाढत्या कामाच्या संदर्भातील चर्चा-सूचना विविध संदर्भात येतात व त्यावर विविध दृष्टिकोनातून चर्चा होते. वेगवेगळे दृष्टिकोन मांडले जातात मात्र त्यावर तोडगा असा निघू शकत नाही. यातून आपापल्या प्रकारे तडजोड करून कर्मचारी-कंपन्या आणि त्यांचे कामकाज चालू ठेवण्याची तडजोड साधली जाते हे वास्तव आहे. त्यामुळे मूळ प्रश्नावर विचार करून संबंधित उद्योग-व्यवसायासाठी गरजेचे पूर्तता करण्यासाठी कर्मचारी त्यांचे कामकाज व कामाचे तास यांची निश्चिती गरजेची ठरते. त्यासाठी व्यवस्थापकांनी आपापल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने व विशेष स्वरुपात  LBDN (Working Busy Doing Nothing)  अशा कर्मचाऱ्यांना कार्यक्षम केले तर कर्मचाऱ्यांचे वाढीव तास व त्यावरील चर्चेला आळा तर बसेलच, शिवाय उत्पादक कार्यसंस्कृती त्यातूनच विकसित होईल.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.