नव्या वर्षात टीम इंडियातील आणखी दिग्गज निरोप घेण्याची शक्यता
वृत्तसंस्था/मुंबई
भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, अश्विनची निवृत्ती ही फक्त टीम इंडियातील बदलाची सुरुवात आहे. आगामी काळात अनेक दिग्गज खेळाडू क्रिकेटला निरोप देऊन नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देतील, असा अंदाज बांधला जात आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पुढील हंगाम सुरु होणार आहे. नव्या हंगामात टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यामुळे इंग्लंड दौऱ्याच्या आधी टीम इंडियातील बदलाची सुरुवात होऊ शकते. ऑस्ट्रेलियात सुरु असलेली बॉर्डर-गावसकर करंडक ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रातील भारताची शेवटची मालिका आहे आणि भारतीय संघातील जुन्या पिढीसाठी ही शेवटची मालिका असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रोहित-विराटचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा?
सध्याच्या घडीला कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, आर. अश्विन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व रविंद्र जडेजा हे अनुभवी खेळाडू गेल्या काही वर्षापासून टीम इंडियाचा भाग आहेत. या दिग्गज खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात आपले स्थान निर्माण केले. अर्थात, जे 2012 आणि 2013 दरम्यान अशाच बदलातून आले होते. त्यादरम्यान सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी आपली जागा सोडली होती. एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, रोहित-विराटसह अन्य खेळाडूंचे वय पस्तीशीच्या पुढे आहे. यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारतीय संघाच्या आशा जर-तर वर अवलंबून आहेत. अश्विनची निवृत्ती ही टीम इंडियामध्ये मोठ्या बदलाची नांदी ठरू शकते. आगामी काळात अनेक वरिष्ठ खेळाडू क्रिकेटला अलविदा करताना दिसतील. जेणेकरुन पुढच्या पिढीसाठी संघात जागा निर्माण करता येईल. यामुळे कदाचित रोहित, विराटसाठी हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादव, जैस्वाल, गिल, सरफराज नव्या दमाचे नवे शिलेदार
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड यांचा कालखंड एका दशकापूर्वी संपला. यानंतर रोहित, विराट, अश्विन, जडेजा, रहाणे या शिलेदारांनी टीम इंडियाची धुरा सांभळताना पुढील एक दशक गाजवले. आता, 2025 हे नवे वर्ष सुरु होत आहे. रोहित विराट यांच्यासह अन्य खेळाडूंनी आपल्या अद्बभूत खेळीने टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले आहेत. अर्थात, सातत्याने खेळत असताना हे दिग्गज आता चाळीशीच्या घरात आहेत. यामुळे निवृत्ती घेत नव्या पिढीसाठी जागा करणे, हा अलिखित नियमच आहे. सध्याच्या घडीला अनेक सुर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान, कुलदीप यादव, रिंकू सिंग सारखे युवा खेळाडू टीम इंडियात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या नव्या दमाच्या शिलेदाराकडे टीम इंडियाची आगामी काळात मदार असणार हे निश्चित आहे.
पुजारा-रहाणेला संधी मिळण्याची शक्यता कमीच
चांगली कामगिरी करणाऱ्यासाठी भारतीय संघाचे ‘दरवाजे खुले आहेत’, असे कर्णधार रोहित शर्मा वारंवार सांगत असला तरी चेतेश्वर पुजारा आणि रहाणेपासून टीम इंडिया बरीच पुढे गेल्याचे सध्याचे चित्र आहे. अश्विनलाही असेच काही संकेत मिळाले, कारण वॉशिंग्टन सुंदरने अचानक न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत प्रवेश केला आणि पर्थ कसोटीत त्याला जडेजा आणि अश्विनच्याही वर संधी देण्यात आली. अश्विनचा निवृत्तीचा निर्णय किती नियोजनबद्ध होता हे निश्चित सांगणे कठीण आहे, परंतु भारतीय संघात आगामी काळत लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 2025 च्या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये त्याची पुढील कसोटी मालिका सुरू होईपर्यंत हे बदल होतील. अश्विनची निवृत्ती हा इतरांसाठी संकेत आहे. येत्या काळात अनेक मोठे बदल घडणार आहेत, हे मात्र निश्चित