राज्यातील निम्म्याहून अधिक रुग्णवाहिका सेवेसाठी अयोग्य
817 पैकी 377 सुस्थितीत तर 440 खराब अवस्थेत : राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज
बेळगाव : आपत्कालिन रुग्णसेवेत आरोग्य कवच योजनेंतर्गत असलेल्या 108 रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, राज्यातील निम्म्याहून अधिक रुग्णवाहिका निष्क्रिय असून, रुग्णसेवेसाठी त्या अयोग्य असल्याचे समजते. राज्यात आरोग्य कवच योजनेंतर्गत 817 रुग्णवाहिका आहेत. यापैकी केवळ 377 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. 440 रुग्णवाहिका या जीर्ण झाल्या असून, यापैकी 50 टक्के रुग्णवाहिका या अत्यंत खराब अवस्थेत आहेत. बेळगाव जिल्ह्यात 56 रुग्णवाहिका कार्यरत असून, यापैकी 6 रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत.
आपत्कालिन रुग्णसेवा वेळेवर न मिळाल्यास रुग्णाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते. यासाठी राज्यसरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णवाहिकांची समस्या निकाली काढण्याची आवश्यकता आहे. आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिकाच देवदूताची भूमिका बजावते. मात्र, सध्या रुग्णवाहिकाच व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.
नादुरुस्त असलेल्या रुग्णवाहिका सेवेत असल्यातरी आपत्कालिन काळात याचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. काहीवेळा तर रुग्णवाहिका रस्त्याच्या मध्यभागीच बंद पडत असल्याचे समजते. तसेच वर्षातून एकदाही रुग्णवाहिकांचे सर्व्हिसिंग होत नसल्याने चालवताना रुग्णवाहिकेवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. आपत्कालिक वेळेत अत्यंत गांभीर्याने व योग्यरित्या रुग्णवाहिका चालवावी लागते. काहीवेळा चालकालाच लहानसहान दुरुस्ती करून घ्यावी लागत असल्याचे समजते.
166 रुग्णवाहिकांची आवश्यकता
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 60 हजार लोकसंख्येमागे 1 रुग्णवाहिका असावी. सध्या राज्याची लोकसंख्या जवळपास 7 कोटी आहे. त्यानुसार गणना केल्यास राज्यात 1166 रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. राज्यात 817 रुग्णवाहिका असूनही केवळ 377 कार्यरत आहेत. ही बाब आरोग्यसेवेसाठी धोकादायक असून, राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.