बेळगावसह विविध जिल्ह्यात शंभरहून अधिक कुष्ठरोगी
कुष्ठरोग जागृती आंदोलन 13 फेब्रुवारीपर्यंत : वेळेत उपचार करून रोगमुक्त करण्याच्या डॉक्टरांच्या जबाबदारीत वाढ
बेळगाव : देशात कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यात आरोग्य खाते प्रयत्न करीत असले तरी कुष्ठरोग्यांचे प्रमाण कमी होत नाही. राज्यात बेळगावसह बेंगळूर शहर, बळ्ळारी, कोप्पळ, विजयनगर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी शंभरहून अधिक कुष्ठरोगी आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांवर वेळेत उपचार करून रोगमुक्त करण्याची डॉक्टरांची जबाबदारी आणखी वाढली आहे. राज्यामध्ये सध्या 1 हजार 785 कुष्ठरोगी आढळून आले आहेत. यामध्ये बहुतांश रुग्ण हे परप्रांतीय आहेत. रोजीरोटीसाठी परप्रांतातून राज्यात आलेल्या कामगारांत कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आली आहेत.
महात्मा गांधीजींनी कुष्ठरोग्यांबद्दल अधिक सहानुभूती व काळजी घेतली होती. या पार्श्वभूमीवर ‘स्पर्श’ कुष्ठरोग जागृती आंदोलन कार्यक्रम देशभरात सुरू करण्यात आले आहे. 30 जानेवारीपासून या जागृती आंदोलनाला सुरुवात झाली असून 13 फेब्रुवारीपर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये आंदोलन होणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात कुष्ठरोग तपासणी शिबिरे होणार असून, रुग्णांवर सहा महिने ते वर्षभरापर्यंत वैद्यकीय चिकित्सेबरोबर विविध सुविधा देण्यासाठीही सरकार कटिबद्ध आहे.
कुष्ठरोगाबद्दल ग्रामीण जनतेला माहिती देणार
राज्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या कुष्ठरोग जागृती आंदोलनांतर्गत शाळा, कार्यालये व संघ-संस्थांच्या कार्यालयातून कुष्ठरोग जागृती कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण स्तरावर कुष्ठरोगाबद्दल ग्रामीण जनतेला माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील मंगळूर, उडुपी, शिमोगा, कोडगू या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 20 ते 30 कुष्ठरोगी आढळून आले आहेत. कोविड काळात कुष्ठरोग्यांवर व्यवस्थित वैद्यकीय उपचार न मिळाल्याने संसर्ग वाढला असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
वेळीच उपचार करणे गरजेचे
कुष्ठरोग हा प्रामुख्याने मायक्रो बॅक्टेरियम लॅप्रे या विषाणूमुळे होतो. कुष्ठरोग अनेक दिवस शरीरात मुरून राहतो. थोड्या प्रमाणात असलेला हा आजार नंतर बळावत जातो. लक्षणे समजून येण्यासाठी सहा महिन्यांपासून 40 वर्षांपर्यंत कालावधी निघून जातो. कुष्ठरोग हा काही प्रमाणात सांसर्गिक रोग आहे. औषधोपचाराने कुष्ठरोग बरा होऊ शकतो. मात्र, वेळीच उपचार करणे गरजेचे असते.
ई-संजीवनीद्वारे टेलिकन्सल्टेशन व्यवस्थाही
कुष्ठरोग्यांना सरकारमार्फत काही सुविधा देण्यात येत असतात. मोफत मल्टीड्रग थेरपी, बीपीएमआर अॅक्टिव्हिटी, सेल्फकेअर किट, एमसीआर फुटवेअर, आरसी सर्जरी यासारख्या व्यवस्था आहेत. ई-संजीवनीद्वारे टेलिकन्सल्टेशन व्यवस्थाही सरकारकडून उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.