जिल्ह्यातील 40 हजारहून अधिक शेतकऱ्यांकडून अद्याप नोंदणी नाही
शेतकऱ्यांचे बँक खाते आधारला लिंक नसल्याचे स्पष्ट : कागदपत्रे मिळविण्यात अडचणी : 5 लाख 40 हजार जणांना किसान योजनेचा लाभ
बेळगाव : यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी बागायत व कृषी खात्याकडून पीक नुकसानीचा अहवाल मागविला होता. तसेच शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र शेतकरी नोंदणी व एकत्रित लाभार्थी माहिती प्रणाली (फ्रूट्स आयडी)द्वारे कागदपत्रे मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच नुकसान भरपाई मिळणार असल्याचे समजते.
अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. चालू वर्षात जिल्ह्यात मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या करून घेतल्या होत्या. मात्र पावसाचा जोर वाढल्याने हाताशी आलेली पिके वाया गेली. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. यानंतरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतशिवारात पाणी आले. परिणामी दुबार पेरणी ही नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसह आर्थिक संकटांचाही सामना करावा लागला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी राज्य शासनाकडून नुकसानीचा अहवाल मागविण्यात आला होता. यानंतर अहवालाची समिक्षा करून नुकसानभरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. पीएम किसान व कृषी भाग्य यांसह विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करावी लागू नयेत, यासाठी फ्रूट्स आयडी प्रणाली लागू केली. तथापि शेतकऱ्यांचे बँक खाते आधारला लिंक नसल्यामुळे, जमिनीचे सिमांकन न झाल्याने व जमिनीची नोंदणी होत नसल्याने जिल्ह्यातील 40 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.
जिल्ह्यातील 5 लाख 80 हजारपैकी 5 लाख 40 हजार शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असून सर्वांनी फ्रूट्स आयडी प्रणाली पूर्ण केली आहे. उर्वरित 40 हजार शेतकऱ्यांनी फ्रूट्स आयडी दाखल केलेली नाही. त्यांना कागदपत्रांचा अडथळा येत असल्याने त्यांनी आयडी दाखल केलेली नाही. या सर्व शेतकऱ्यांचे सरकारी बँकेत खाते नाही. तसेच वडिलोपार्जित मालमत्ता त्यांच्या नावावरही हस्तांतरीत केलेल्या नाहीत. यापैकी बहुतांश मोठे शेतकरी असून शहरी भागात वास्तव्यास आहेत. त्यांची जमीन इतर लोक कसत आहेत. यामुळे त्यांनी फ्रूट्स आयडी दाखल केलेली नाही.